१लीच्या मुलीचे वार्षिक शुल्क ४.२७ लाख

चांगले शिक्षण आज एक लक्झरी आहे असे म्हणत एका वडिलांनी सविस्तर फी रचना शेअर केली आहे. २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असले तरी हे शुल्क परवडेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जयपूर: आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे यासाठी सर्व पालक प्रयत्नशील असतात. मात्र पहिलीच्या वर्गात मुलीला प्रवेश मिळवण्यासाठी गेलेल्या एका वडिलांनी शेअर केलेली फी रचना पाहून कोणालाही धक्का बसेल. एका वर्षाचे एकूण शुल्क ४.२७ लाख रुपये! २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असले तरी हे शुल्क परवडेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

'चांगले शिक्षण आज एक लक्झरी आहे. मध्यमवर्गीयांना ते परवडणारे नाही'- असे म्हणत जयपूरच्या एका शाळेतील पहिलीच्या वर्गासाठीच्या एका वर्षाच्या फी रचना ऋषभ जैन यांनी शेअर केली आहे. त्यांच्या मुलीला पुढच्या वर्षी पहिलीत प्रवेश घ्यायचा आहे. शहरातील एका शाळेतील ही फी रचना आहे. इतर शाळांमध्येही अशीच परिस्थिती आहे, असे जैन यांनी म्हटले आहे.

नोंदणी शुल्क - २०००, प्रवेश शुल्क - ४०,०००; हमी ठेव (परत मिळणारी) - ५०००, वार्षिक शाळा शुल्क - २,५२,०००, बस शुल्क - १,०८,०००, पुस्तके आणि गणवेश - २०,०००, एकूण वार्षिक शुल्क ४,२७,००० रुपये. उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम सरकार आयकर, जीएसटी, पेट्रोलवरील व्हॅट, रोड टॅक्स, टोल टॅक्स, व्यावसायिक कर, भांडवली नफा, जमीन नोंदणी शुल्क या स्वरूपात घेते, असे जैन यांनी म्हटले आहे. आरोग्य विमा, पीएफ, एनपीएसमध्येही पैसे जातात. सरकारी योजनांसाठी तुम्ही पात्र नाही. श्रीमंतांप्रमाणे मोफत सेवा किंवा कर्जमाफी मिळणार नाही. उरलेले १० लाख रुपये अन्न, वस्त्र, भाडे, ईएमआय यावर खर्च करा आणि थोडेसे जमा करा. किंवा तुमच्या दोन मुलांचे शाळा शुल्क भरा. काय करायचे ते ठरवा, असेही जैन यांनी म्हटले आहे.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेली ही पोस्ट आतापर्यंत १५ लाख लोकांनी पाहिली आहे. अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी शाळा शुल्काबाबत वडिलांच्या चिंतेला पाठिंबा दिला, तर काहींनी टीका केली. सरकारी जमीन आणि इतर सुविधा अनुदानित दरात मिळत असल्याने भारतातील शाळा केवळ ना-नफा तत्त्वावर चालवल्या जाऊ शकतात, हे विरोधाभासी आहे, असे एका व्यक्तीने म्हटले आहे. तरीही पालक अशा शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी धडपडतात कारण ते प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यापैकी बहुतेक जण अन्याय्य फी रचना स्वीकारतात. १२ वर्षांच्या शिक्षणासाठी एक कोटींहून अधिक रुपये खर्च करावे लागतात, असे दुसऱ्या एकाने म्हटले आहे. मध्यमवर्गीयांना इतके जास्त शुल्क परवडणारे नाही. हा एक गंभीर प्रश्न आहे, असे काहींनी म्हटले आहे.

लक्झरी शाळा निवडणे ही समस्या आहे, अन्यथा मासिक १०,००० रुपयेच शुल्क असेल, अशी दुसरी एक कमेंट आहे. दर्जेदार शिक्षण हे कधीही लक्झरी असू नये. ते एक मूलभूत अधिकार आहे, असे दुसऱ्या एकाने म्हटले आहे. जास्त शुल्क म्हणजे नेहमीच चांगले शिक्षण असे नाही, असे दुसऱ्या एकाने कमेंट केले आहे.

Share this article