भोपाळ दुर्घटनेतील विषारी कचरा: ४ दशकांनंतर विल्हेवाट

भोपाळ गॅस दुर्घटनेच्या ४० वर्षांनंतर, युनियन कार्बाइड कारखान्यातील विषारी कचरा पीथमपूरला हलवण्यात आला आहे. १०० कामगारांनी ३० मिनिटांच्या शिफ्टमध्ये कचरा गोळा करून १२ ट्रकमध्ये नेला.

भोपाळ: जगातील सर्वात भयंकर औद्योगिक दुर्घटना मानल्या जाणाऱ्या, ५,४७९ लोकांचा बळी घेतलेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेचा कचरा तब्बल ४० वर्षांनी हलवण्यात आला आहे. बंद पडलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यातील विषारी कचरा सील करून ट्रकमध्ये भोपाळपासून २५० कि.मी. अंतरावरील धार जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र पीथमपूरला नेण्यात आला. एकूण १२ ट्रकमध्ये हा कचरा नेण्यात आला.

भोपाळ गॅस दुर्घटना मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंग यांनी माहिती दिली की, '१०० कामगारांनी ३० मिनिटांच्या शिफ्टनुसार कचरा गोळा केला असून काम पूर्ण झाले आहे. सर्व काही व्यवस्थित झाल्यास ३ महिन्यांत कचरा जाळला जाईल. अन्यथा या कामासाठी ९ महिने लागू शकतात'.

या कचरा विल्हेवाटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा निर्देश दिले असतानाही काम न झाल्याबद्दल मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना फटकारले आणि या दुर्लक्षामुळे आणखी एक दुर्घटना घडण्याचा धोका असल्याचे बजावले. तसेच, कचरा हलवण्यासाठी ३ डिसेंबरपासून ४ आठवड्यांचा कालावधी दिला होता. या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.

विल्हेवाट कशी?

प्रथम कचरा पीथमपूरच्या विल्हेवाट केंद्रात जाळला जाईल. प्रदूषण रोखण्यासाठी धूर ४ थरांच्या फिल्टरमधून बाहेर सोडला जाईल. त्याच्या राखेत धोकादायक घटक आहेत का ते तपासले जाईल आणि सुरक्षित असल्यास ते माती आणि पाण्यात मिसळू न देता पुरले जाईल.

काय आहे ही दुर्घटना?

१९८४ च्या २ डिसेंबरच्या मध्यरात्री भोपाळच्या युनियन कार्बाइड कारखान्यातून मिथाइल आयसोसायनेट नावाचा विषारी वायू गळती झाली होती. याचा आसपास राहणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता.

Share this article