सार
मोहम्मद युनूस यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती झाल्यानंतर बांगलादेशात अशांतता वाढली आहे. विद्यार्थ्यांनी निदर्शने करत सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यानंतर सरन्यायाधीशांनी राजीनामा दिला.
ढाका : नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती झाल्यानंतरही बांगलादेशात अशांततेचे वातावरण आहे. ताज्या घडामोडीत, विद्यार्थ्यांनी निदर्शने केली आणि सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला. त्यानंतर सरन्यायाधीश उबेदुल हसन यांनी सर्वोच्च न्यायालयातून पळ काढत राजीनामा दिला आहे.
देश सोडून पळून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांचे विश्वासू मानले जाणारे उबेदुल हसन यांनी युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारशी सल्लामसलत न करता पूर्ण खंडपीठाची बैठक बोलावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात निदर्शने सुरू झाली. बैठक बोलावल्यानंतर विद्यार्थी नेत्यांनी उबेदुल हसन यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यानंतर आंदोलन आणखी तीव्र झाले. हसन यांची गेल्या वर्षीच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
52 जिल्ह्यांत हिंदूंवर झाले हल्ले, मोहम्मद युनूस यांच्याकडे मागितले संरक्षण
बांगलादेशची लोकसंख्या 17 कोटी आहे, त्यात हिंदूंची संख्या 7.95 टक्के (1.35 कोटी) आहे. हिंदू धर्म हा बांगलादेशातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. देशातील 64 पैकी 61 जिल्ह्यांमध्ये हिंदूंची मोठी लोकसंख्या राहते. वृत्तानुसार बांगलादेशातील हिंदूंना हसीना यांच्या पक्ष अवामी लीगचे समर्थक मानले जाते. यामुळेच ते आता टार्गेट झाले आहेत. बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषदेनुसार, देशातील 64 पैकी 52 जिल्ह्यांमध्ये हिंदू आणि त्यांच्या मालमत्तांना लक्ष्य करण्यात आले. परिषदेने म्हटले आहे की, अल्पसंख्याकांना भीतीच्या वातावरणात जगावे लागत आहे. त्यांनी सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांच्याकडे सुरक्षा आणि संरक्षणाची मागणी केली आहे.
दरम्यान, बांगलादेशातून भारतात येण्यासाठी एक हजाराहून अधिक लोक सीमेवर अडकून पडल्याचे वृत्त आहे. हे सर्व बांगलादेशातील हिंदू समुदायाचे असून ते भारतात आश्रय घेऊ इच्छित असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, बीएसएफ त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. बीएसएफच्या ईस्टर्न कमांडचे एडीजी या समितीचे प्रमुख असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सांगितले होते की, ही समिती तेथील अल्पसंख्याक आणि भारतीयांच्या सुरक्षेसाठी बांगलादेश सरकारसोबत काम करेल.
आणखी वाचा :
बांगलादेशात विळा घेतलेल्या हिंदू महिलेचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले 'माँ काली'
कोण आहे मुहम्मद युनूस? बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे करणार नेतृत्व