सार
हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणामुळे लोकांची चिंता वाढली आहे. त्यापासून बचाव कसा करावा हा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांना उपचार देणाऱ्या हृदयरोग तज्ज्ञांनी योग्य सल्ला दिला आहे.
हृदयविकाराने (Heart attack) मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुठेही, केव्हाही लोक कोसळून मृत्युमुखी पडत आहेत. हृदयविकाराचे नाव ऐकताच घाम फुटण्याची वेळ आली आहे. अगदी निरोगी (health) असलेली व्यक्ती काही क्षणात आपल्यातून निघून जाण्याच्या अनेक घटना आपण पाहत आहोत. भारतातील लोकप्रिय ग्रीक योगर्ट ब्रँड एपिगामिया (Greek yogurt brand Epigamia) चे सह-संस्थापक आणि सीईओ रोहन मिर्चेन्दानी यांचे २१ डिसेंबर रोजी ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. रोहन यांच्या अकाली निधनामुळे हृदय आरोग्याबाबत अधिक जागरूकता आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. दरम्यान, आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी याबाबत बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (actress Sushmita Sen) यांचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजीव बी भागवत यांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी, अभिनेत्री सुष्मिता सेन यांना धमन्यांमध्ये ९५ टक्के ब्लॉकेज आढळून आले होते. त्यांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्या हृदयविकारापासून बचावल्या. त्यांचे हृदयरोग तज्ज्ञ, नानावती मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. राजीव बी भागवत यांनी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि ताणतणावाचे व्यवस्थापन यांच्या संयोगाने हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो असे सांगितले.
आपला नियमित व्यायाम रक्तातील ऑक्सिजनचा प्रवाह ठरवतो, असे डॉ. भागवत म्हणाले. नियमित आणि मध्यम व्यायाम स्नायूंमध्ये शक्ती साठवण्यास मदत करतो. हृदयातील ब्लॉकेजच्या वेळी हे महत्त्वाचे ठरते.
हृदय आरोग्यात व्यायामाची भूमिका : व्यायाम रक्तातून अधिक ऑक्सिजन घेण्याची स्नायूंची क्षमता वाढवतो. हृदयावरील भार कमी करतो. ताणतणावाची हार्मोन्स कमी करतो. रक्तदाब कमी करतो आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतो. नियमित व्यायाम हृदयविकाराचा धोका कमी करतो आणि धमन्या निरोगी ठेवण्यास मदत करतो. जलद चालणे, जॉगिंग आणि पोहणे यासारख्या क्रिया करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
हृदयविकारानंतर काळजी आणि खबरदारी : हृदयविकारापासून बरे होणाऱ्यांसाठी, डॉ. भागवत यांनी महत्त्वाची माहिती दिली. रुग्णाची स्थिती आणि इतिहास पाहून निर्णय घेतला जातो. दररोज व्यायामाच्या वेळी हृदयाचे ठोके तपासावेत. कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास रुग्णाने हृदयरोग तज्ज्ञांना कळवावे. स्टेंटिंग बसवल्यानंतर सात दिवसांनी हलका व्यायाम सुरू करता येतो, असे डॉ. भागवत म्हणाले. प्रत्येक रुग्णाची स्थिती वेगळी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा.
व्यायामाशिवाय, हृदयाचे आरोग्य राखण्यात आहाराची भूमिका महत्त्वाची आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले. शेंगदाणा तेलासारखी पारंपारिक तेले जास्त तापवली नाहीत तर चांगली. अँटिऑक्सिडंट्स आणि सूक्ष्म पोषकतत्वांनी समृद्ध असलेल्या रंगीबेरंगी भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे. संतुलित आहार महत्त्वाचा आहे. ताणतणाव हा मूक मारेकरी आहे, असे भागवत म्हणाले. तो अॅड्रेनालाईन आणि कॉर्टिसोलचे उत्पादन वाढवतो. यामुळे धमन्यांमध्ये जळजळ आणि प्लेक तयार होऊ शकते. डॉ. भागवत यांनी नियमित वैद्यकीय तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे त्यांनी नियमित हृदय तपासणी करावी.