सार
ऐतिहासिक कुंभमेळ्यासाठी प्रयागराज शहर सज्ज झाले आहे. १४४ वर्षांनंतर होत असलेला हा अतिशय दुर्मिळ कुंभमेळा असल्याने याला महाकुंभ मेळा म्हटले जाते. चार ग्रहांचे दुर्मिळ संयोग..
सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा (Maha Kumbha Mela) सुरू आहे. कोट्यवधी भाविक, साधू, नागा साधू तेथे पवित्र गंगानदीत स्नान करून पुनीत होत आहेत. भारतासह जगातील अनेक देशांमधून सामान्य जनतेसह अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध व्यक्तीही गंगेच्या काठावर मुक्काम ठोकून आहेत. सध्या भारतात महाकुंभमेळ्याची बातमी टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे.
आता, महाकुंभ मेळ्यासंदर्भात एक आश्चर्यकारक गोष्ट व्हायरल होत आहे. 'नागा साधू आणि हिमालयाजवळ राहणाऱ्या साधूंना लोकांशी संपर्कच नसतो. आपल्याकडे कॅलेंडर आहे, मोबाईल आहे, शेकडो न्यूज चॅनेल आहेत. मिनिटात व्हायरल होणारी सोशल मीडिया आहेत. तरीही या महाकुंभ मेळ्याच्या वेळेबद्दल कोट्यवधी लोकांना अजूनही माहिती नाही.
हे अघोरी, साधू संत, तपस्वी कुठेतरी हिमालयाच्या जंगलात, गुहांमध्ये वर्षानुवर्षे लोकांच्या संपर्काशिवाय राहतात, तरीही या एका कुंभस्नानासाठी लाखो साधू हजारो फूट उंच पर्वत उतरून, हजारो मैल प्रवास करून, अगदी अचूकपणे याच वर्षी, याच महिन्यात, ठराविक दिवशी या ठिकाणी येतात हे खरोखरच एक मोठे चमत्कार आहे!..' असे लिहिलेले पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
ऐतिहासिक कुंभमेळ्यासाठी प्रयागराज शहर सज्ज झाले आहे. १४४ वर्षांनंतर होत असलेला हा अतिशय दुर्मिळ कुंभमेळा असल्याने याला महाकुंभ मेळा म्हटले जाते. चार ग्रहांचा दुर्मिळ योग जुळत असल्याने १४४ वर्षांनी हा कुंभमेळा होत आहे. यावेळी होत असलेल्या कुंभमेळ्यात सुमारे ४५ कोटींहून अधिक लोक पुण्यस्नान करतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत बरेच लोक जाऊन पुण्यस्नान करून परतले आहेत.
कुंभमेळा, अर्धकुंभ आणि पूर्ण कुंभांच्या तुलनेत महाकुंभमेळा का खास आहे हे माहित आहे का? कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे, जो दर १२ वर्षांनी भारतातील चार पवित्र स्थळांपैकी एका प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन किंवा नाशिक येथे आयोजित केला जातो. यावर्षी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा होत आहे. पण हा १४४ वर्षांनी एकदाच होणारा महाकुंभ मेळा आहे.
गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी जगभरातील लाखो भाविक या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत आहेत. पवित्र नदीत स्नान केल्याने पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे. ४४ दिवस चालणाऱ्या महाकुंभमेळ्याला १३ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांतीपासून सुरुवात होऊन २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला समाप्ती होईल.