नकाशावर जहाज बुडाल्याचे ठिकाण असल्याचे दिसल्याने तेथे डायव्हिंग केले असता हा प्रवाळ दिसला, असे छायाचित्रकाराने सांगितले.
होनियारा: जगातील सर्वात मोठा प्रवाळ सापडला आहे. नैऋत्य पॅसिफिक महासागरातील सॉलोमन बेटांवर हा महाकाय प्रवाळ सापडला आहे. ३०० वर्षांहून अधिक जुना असलेला हा प्रवाळ १०४ फूट लांब, १११ फूट रुंद आणि १८ फूट उंच आहे. हवामान बदलाचा समुद्रावर कसा परिणाम होतो हे शोधण्यासाठी नॅशनल जिओग्राफिकच्या मोहिमेदरम्यान छायाचित्रकार मनु सॅन फेलिक्स यांना हा प्रचंड प्रवाळ सापडला.
लाखो सूक्ष्मजीवांचा समूह म्हणजे प्रवाळ. आता सापडलेला प्रवाळ हा ब्लू व्हेलपेक्षाही मोठा आहे, असे मोहिमेतील सदस्यांनी सांगितले. नकाशावर जहाज बुडाल्याचे ठिकाण असल्याचे दिसल्याने तेथे डायव्हिंग केले असता हा प्रवाळ दिसला, असे छायाचित्रकाराने सांगितले. पाण्याखाली एका कॅथेड्रलसारखा हा प्रवाळ दिसत होता, असेही मनु फेलिक्स म्हणाले.
हवामान बदलामुळे समुद्राचे तापमान वाढत असल्याने जगभरातील प्रवाळांना धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरच्या अहवालानुसार, समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याने ४४ टक्के प्रवाळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हा नवा प्रवाळ खूप खोलीवर सापडला आहे. म्हणूनच समुद्राच्या पृष्ठभागावरील उच्च तापमानाचा या प्रवाळावर परिणाम झाला नसेल, असे संशोधकांचे मत आहे. मासे आणि इतर अनेक सागरी जीवांचे निवासस्थान म्हणजे प्रवाळ.
अझरबैजानच्या बाकू येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेदरम्यान या नव्या प्रवाळाच्या शोधाची घोषणा करण्यात आली. हा अभिमानास्पद शोध असल्याची प्रतिक्रिया सॉलोमन बेटांचे हवामान मंत्री ट्रेव्हर मानेमाहाग यांनी दिली. हे एक अनोखे ठिकाण आहे आणि त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे हे जगाला कळावे अशी आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले. सागरी संसाधनांवरच या बेटाचे अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे प्रवाळ खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचे नुकसान होत नाही याची खात्री करणे आवश्यक आहे, असेही मंत्री म्हणाले. अतिशय तीव्र चक्रीवादळांसह जागतिक तापमानवाढीचे परिणाम बेटाला भोगावे लागत आहेत, असेही मंत्र्यांनी सांगितले.