अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच, भारतात शिक्षण घेणाऱ्या अमेरिकन विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या वर्षी ३०० वरून १३०० पर्यंत वाढली आहे.
दिल्ली: शिक्षण क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात दीर्घकाळापासून भागीदारी आहे. २००९ नंतर पहिल्यांदाच, इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अमेरिकेत पाठवणारा देश म्हणून भारत उदयास आला आहे, असे अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी म्हटले आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ३,३०,००० हून अधिक भारतीय विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी दाखल झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही २३ टक्के वाढ आहे.
सलग दुसऱ्या वर्षी, अमेरिकेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय मास्टर्स पदवी विद्यार्थी पाठवणारा देश म्हणून भारताने आपले स्थान कायम ठेवले आहे. भारतातून १,९७,००० हून अधिक विद्यार्थी मास्टर्स पदवी अभ्यासक्रमांमध्ये दाखल झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही १९ टक्के वाढ आहे. भारतातून पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १३ टक्क्यांनी वाढून ३६,००० हून अधिक झाली आहे.
दरम्यान, भारतात शिक्षण घेणाऱ्या अमेरिकन विद्यार्थ्यांच्या संख्येत ३०० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ३०० वरून ही संख्या १३०० पर्यंत पोहोचली आहे. ओपन डोअर्स अहवाल जागतिक विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांचे आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे फायदे साजरे करणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिक्षण सप्ताहाची सुरुवात करतो. याचाच एक भाग म्हणून, जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे गुप्ता-क्लिन्स्की इंडिया इन्स्टिट्यूट आणि यूएस-इंडिया अलायन्स फॉर विमेन्स इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि वैद्यकशास्त्र (STEMM) क्षेत्रातील महिला शास्त्रज्ञ आणि संशोधकांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय शिक्षण सप्ताहादरम्यान महिलांसाठी फेलोशिपची सुरुवात करणे हा क्षण अधिक अर्थपूर्ण आणि विशेष बनवते, असे अमेरिकेचे राजदूत गार्सेटी म्हणाले. शिक्षण हे सीमांनी बांधलेले नाही आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी देश आणि संस्थांमधील सहकार्य महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. जागतिक नवोन्मेषासाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे अध्यक्ष रोनाल्ड जे. डॅनियल्स म्हणाले.
मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावास आणि डेव्हर विद्यापीठ लवकरच यूएस-इंडिया उच्च शिक्षण सहकार्य आणि भागीदारीचे वर्णन करणारी एक डिजिटल मार्गदर्शिका प्रकाशित करणार आहेत. ही मार्गदर्शिका भारतीय महाविद्यालये आणि विद्यापीठांना अमेरिकन शिक्षण प्रणाली, अमेरिकन महाविद्यालये आणि विद्यापीठांशी भागीदारी करून कॅम्पसचे जागतिकीकरण करण्यासाठी माहिती, यशस्वी सहकार्यासाठी सर्वोत्तम पद्धती, कॅम्पसमध्ये विविधता आणि समतेचे महत्त्व, विद्यार्थी-शिक्षक विनिमय, अभ्यासक्रम विकास आणि संशोधन-माहितीची देवाणघेवाण यासारख्या विविध भागीदारी निर्माण करण्याचे मार्ग प्रदान करेल.
अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट राजस्थानमधील बारा आणि तेलंगणामधील भूपालपल्ली जिल्ह्यांमध्ये मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना मूलभूत साक्षरता आणि स्वच्छता कौशल्ये सुधारण्यासाठी सेसमी वर्कशॉप इंडिया ट्रस्टसोबत 'लर्न प्ले ग्रो' नावाचा उपक्रम सुरू करून आंतरराष्ट्रीय शिक्षण सप्ताह साजरा करत आहे. या उपक्रमात अंगणवाडीतील २०,००० ते २५,००० मुले थेट सहभागी होतील.
भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकन शिक्षणाच्या संधी एक्सप्लोर करणे सोपे करण्यासाठी https://educationusa.in ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. महाविद्यालय अर्ज प्रक्रियेबद्दल नवीनतम माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थी मोफत एज्युकेशन यूएसए इंडिया अॅप डाउनलोड करू शकतात. https://educationusa.in/ ही वेबसाइटही भेट देऊ शकतात.