बीजिंग: चीन सांगपो नदीवर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प बांधण्याच्या तयारीत आहे. तिबेटच्या पठाराच्या पूर्वेकडील काठावर चीन हा प्रचंड धरण बांधत आहे. जलविद्युत धरणाच्या बांधकामाला चीनने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प भारतातील आणि बांगलादेशातील लाखो लोकांना बाधित करू शकतो, असे वृत्त आहे. २०२० मध्ये चीनच्या पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनने दिलेल्या आकडेवारीनुसार, यारलुंग सांगपो (त्सांगपो) नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाला दरवर्षी ३०० अब्ज किलोवॅट तास वीज निर्मिती करण्याची क्षमता असेल. सध्या जगातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या थ्री गॉर्जेस धरणाच्या क्षमतेच्या तिप्पटपेक्षा जास्त.
चीनचे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, कार्बन तटस्थतेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, अभियांत्रिकीशी संबंधित उद्योगांना चालना देण्यासाठी आणि तिबेटमध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे अधिकृत वृत्तसंस्था सिन्हुआने बुधवारी वृत्त दिले आहे. यारलुंग सांगपोचा एक भाग ५० किलोमीटरच्या परिधीत २००० मीटर (६,५६१ फूट) खाली येतो. येथे जलविद्युत प्रकल्पासाठी मोठी क्षमता आहे असा अंदाज आहे. त्याच वेळी, अभियांत्रिकी आव्हाने भरपूर असतील.
थ्री गॉर्जेस धरणाच्या तिप्पट खर्च अपेक्षित आहे. अंदाजे २५४.२ अब्ज युआन (३४.८३ अब्ज डॉलर) खर्च येईल. विस्थापित झालेल्या १.४ दशलक्ष लोकांचे पुनर्वसन यासह खर्च अंदाजित करण्यात आला आहे. पूर्वी ५७ अब्ज युआन खर्च अपेक्षित होता. या योजनेमुळे किती लोकांना विस्थापित करावे लागेल आणि पठारावरील सर्वात समृद्ध आणि वैविध्यपूर्ण स्थानिक परिसंस्थेवर त्याचा कसा परिणाम होईल हे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. मात्र, हा प्रकल्प पर्यावरणीय समस्यांवर किंवा खालच्या भागातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम करणार नाही, असे अधिकारी म्हणतात.
तरीही, भारत आणि बांगलादेशने धरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. यारलुंग सांगपो तिबेटमधून दक्षिणेकडे भारताच्या अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर सियांग नदी आणि आसाममध्ये पोहोचल्यावर ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. तिबेटच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या यारलुंग सांगपोच्या वरच्या भागात चीनने जलविद्युत उत्पादन सुरू केले आहे.