नवीन LHB कोच: निळ्या ICF कोचचा निरोप, रेल्वेचा मोठा निर्णय

भारतीय रेल्वे ICF कोच LHB कोचने बदलत आहे. जुन्या तंत्रज्ञानाच्या ICF कोचऐवजी सुधारित तंत्रज्ञानाचे LHB कोच वापरले जातील.

नवी दिल्ली: तुम्ही जर नेहमी रेल्वेने प्रवास करत असाल तर वंदे भारत एक्सप्रेस वगळता बहुतेक रेल्वे गाड्या निळ्या आणि लाल रंगाच्या कोच असलेल्या असतात. सामान्य लोकांसाठी हे फक्त रंग असले तरी यामागे कोचचे वैशिष्ट्ये दडलेली असतात. रेल्वेच्या प्रत्येक रंगाचे स्वतःचे वैशिष्ट्य असते. निळे कोच जुने असतात, तर लाल कोचमध्ये सुधारित तंत्रज्ञान असते. आता भारतीय रेल्वे निळ्या रंगाचे कोच बंद करण्याच्या तयारीत आहे. निळ्या रंगाच्या कोचऐवजी लाल रंगाचे कोच येतील. 

सध्या भारतीय रेल्वेमध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) आणि लिंक हॉफमन बुश (LHB) असे दोन प्रकारचे कोच धावतात. जुन्या तंत्रज्ञानाचे ICF कोच निळे असतात. LHB कोच हे नवीन तंत्रज्ञानाचे असून ते लाल रंगाचे असतात. आता भारतीय रेल्वे जुन्या तंत्रज्ञानाच्या ICF कोच हळूहळू नवीन तंत्रज्ञानाने बदलण्याची योजना आखत आहे. पुढील काही वर्षांत निळ्या रंगाचे कोच दिसेनासे होतील. 

मार्च अखेरपर्यंत भारतीय रेल्वे सुमारे 2,000 LHB कोच तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे कोच स्लीपर आणि जनरल प्रकारचे असतील. हे कोच टप्प्याटप्प्याने रेल्वेगाड्यांमध्ये जोडले जातील, अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. किमान 1,300 कोच जोडण्याचे उद्दिष्ट डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. उर्वरित 700 LHB कोच ICF कोचसह बसवण्यासाठी मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आधीच निळ्या रंगाच्या कोचची संख्या कमी होत चालली आहे. सध्या ICF कोचसह 740 रेल्वेगाड्या धावत आहेत. 2026-27 या आर्थिक वर्षाच्या आत हे सर्व कोच बदलण्याचे उद्दिष्ट भारतीय रेल्वेने ठेवले आहे.

निळ्या रंगाचा ICF कोच कसा असतो?


निळ्या रंगाच्या ICF कोचचे उत्पादन 1952 मध्ये चेन्नई येथे सुरू झाले. हे कोच स्टीलचे बनलेले असले तरी त्यांचे वजन जास्त असते. यात एअरब्रेक असतात आणि त्यांची देखभाल महाग असते. या कोचची क्षमता कमी आहे. स्लीपरमध्ये 72 आणि थर्ड एसी कोचमध्ये 64 आसने असतात. हे कोच LHB पेक्षा 1.7 मीटर कमी लांबीचे असतात. अपघाताच्या वेळी ICF कोच एकमेकांवर चढतात. दर 18 महिन्यांनी ICF कोचची सर्व भागांची तपासणी करावी लागते.

लाल रंगाचा LHB कोच कसा असतो?


2000 पासून जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून LHB कोचचे उत्पादन पंजाबमध्ये सुरू झाले. स्टेनलेस स्टीलचा वापर केल्याने कोच हलके असतात आणि डिस्क ब्रेक वापरले जातात. ताशी 200 किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या या कोचमध्ये स्लीपरमध्ये 80 आणि थर्ड एसीमध्ये 72 आसने असतात. ICF पेक्षा 1.7 मीटर लांब असलेले हे कोच अपघाताच्या वेळी एकमेकांवर चढत नाहीत. दर 24 महिन्यांनी LHB कोचची तपासणी करावी लागते. 

Share this article