मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून मुंबईत अचानक एवढा पाऊस का पडतोय याबद्दल हवामान खात्याने स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबईसह पुणे आणि राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. पुणे वेधशाळेने (IMD Pune) पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दोन दिवस पाऊस तीव्र राहील आणि त्यानंतर त्याचा जोर काहीसा कमी होईल.
25
कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मान्सूनचे वारे सक्रिय झाल्याने द्रोनीय रेषा (Trough Line) उत्तर कोकण ते केरळपर्यंत पसरली आहे. यामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून, उर्वरित भागात सरी कोसळत आहेत.
35
पुढील दोन दिवसांचा पावसाचा अंदाज
हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी गंभीर इशारे दिले आहेत.
कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट – मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
राज्यात वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये दाखल होऊन आढावा घेतला. पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
55
आपत्ती व्यवस्थापनाची तयारी
मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर, अडकलेल्या लोकांची सुटका आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना यावर चर्चा केली. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पावसाच्या तीव्रतेवर सरकारचे बारकाईने लक्ष असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.