Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे सर्व खासगी तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांना सुट्टी

Published : Aug 19, 2025, 09:42 AM IST

मुंबई - मुंबई आणि उपनगरात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. रस्ते जलमय झाले, रेल्वे सेवा उशिरा धावू लागली. या पार्श्वभूमीवर मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व खासगी तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

PREV
16
अतिमुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई महानगर प्रदेशात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही पावले उचलली आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

महानगरपालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, फक्त आपत्कालीन सेवा देणारी कार्यालये आणि यंत्रणा सुरू राहतील. यामध्ये आरोग्यसेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, जलपुरवठा, वीजपुरवठा आणि आपत्कालीन दुरुस्ती यांचा समावेश आहे. इतर सर्व खासगी तसेच निमशासकीय कार्यालयांना एका दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.

26
‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची परवानगी

तसेच, संबंधित कंपन्या आणि आस्थापनांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत. कार्यालये बंद असली तरी अत्यावश्यक कामकाज सुरू ठेवण्यासाठी दूरस्थ पद्धतीचा अवलंब करावा, अशी विनंती पालिकेकडून करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई व उपनगरात मुसळधार पावसाचे सत्र सुरू आहे. सोमवारच्या पहाटेपासूनच अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागांत पाण्याचे साम्राज्य पाहायला मिळाले. सायन, कुर्ला, चेंबूर, भांडुप, मुलुंडसह मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्ते व घरांमध्ये पाणी शिरले. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली.

36
अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन

महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, पाणी साचलेल्या भागात विद्युत उपकरणांचा वापर टाळावा, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत १९१६ या पालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

46
शाळा आणि महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर

दरम्यान, मुसळधार पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. सार्वजनिक वाहतूक यंत्रणांवर मात्र मोठा ताण पडला असून, बेस्टच्या बस सेवा पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत.

56
आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतत कार्यरत

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका, पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतत कार्यरत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येत असून, सतर्कतेचे आवाहन वारंवार केले जात आहे.

66
मुंबईकरांच्या सुरक्षेला प्राधान्य

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज जीवन विस्कळीत झाले असून, सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने सुट्टीचा निर्णय घेतला आहे.

Read more Photos on

Recommended Stories