वर्धा येथील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेने गुरुवारी पत्रकार परिषद घेत संपूर्ण परिवारावर काही गंभीर आरोप लावले आहेत. याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला 20 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यातच सभा आहे.
Pooja Tadas Allegation on Family : भाजप खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांची सून पुजा तडसने संपूर्ण परिवारावर काही गंभीर आरोप केले आहेत. पुजा तडस यांनी गुरुवारी (11 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला पुजा तडस यांच्यासोबत उद्धव ठाकरे गटातील शिवसेना नेता सुषमा अंधारेही (Sushma Andhare) उपस्थितीत होत्या. पुजा तडस यांनी कुटुंबियावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पुजा तडस काय म्हणाल्या?
पुजा तडस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, तडस परिवाराने मला बेघर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संपूर्ण देशाला आपला परिवार मानतात त्यांच्या कुटुंबातील मुलीवर अन्याय का? याशिवाय चारित्र्यावर संशयही घेतला गेल्याचे पुजा तडस यांनी म्हटले आहे.
डीएनए टेस्ट करायलाही तयार
पुजा तडस यंदाच्या लोकसभेसाठी वऱ्यातून निवडणूक लढणार आहेत. खरंतर, तडस परिवाराने परस्पर घराची विक्री केली आणि मला घराबाहेर काढल्याचे पुजा यांनी सांगितले. याशिवाय माझ्या मुलाचा बाप कोण हे सिद्ध करायला मी डीएनए चाचणी (DNA Test) करण्यासाठीही तयार असल्याचे पुजा तडस यांनी पत्रकार परिषदेवेळी बोलून दाखवले. ऐवढेच नव्हे माझ्या चारित्र्यावरही संशय घेण्यात आल्याचेही पुजा तडस म्हणाल्या.
पंतप्रधानांची 20 एप्रिलला वर्ध्यात सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 20 एप्रिलला वर्ध्यात सभा होणार आहे. त्याआधीच वर्ध्यातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनने लावलेल्या गंभीर आरोपांमुळे सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पत्रकार परिषदेत पुजा तडस म्हणाल्या की, पंतप्रधानांनी वर्ध्यातील सभेसाठी आल्यानंतर मला वेळ द्यावा. या प्रकरणात मोदींनी लक्ष घालावे. ज्या उमेदवाराला आपल्याच घरच्या मंडळींना न्याय देता येत नाही तो इतरांना कसा न्याय देणार असाही प्रश्न पुजा तडस यांनी पत्रकार परिषदेवेळी उपस्थितीत केला.
रामदास तडस यांची दिली प्रतिक्रिया
रामदास तडस यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. रामदास तडस म्हणाले की, निवडणुकीच्या काळात आरोपप्रत्यारोप केले जातात. हे प्रकरण राजकीय षडयंत्र आहे. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही. याव्यतिरिक्त माझ्या मुलाला जीवेमारण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे रामदास तडस यांनी म्हटले.
पंकज तडस यांची प्रतिक्रिया
पुजा तडस यांनी कुटुंबियावर लावलेल्या आरोपानंतर पंकज तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझासोबत बोलताना पंकज तडस म्हणाले की, वर्ष 2020 मधील खरंतर घटना आहे. या प्रकरणात काहींनी हनी ट्रॅप करत मला फसवले आहे. यासंबंधितचे पुरावेही कोर्टात सादर केले आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यामधीलच काहीजण सध्या जामिनावर बाहेर आहेत.
दुसऱ्या बाजूला पुजा तडस मुद्दा कोर्टात हजर राहत नाही. त्यांनी आमच्याकडे खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील दाखल केली आहे. याशिवाय विवाह मोडण्यासाठी न्यायालयात धावही घेतली आहे. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर अधिक बोलू शकत नसल्याचेही पंकज तडस यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा :
पुणे येथे बनावट शेअर ट्रेडिंग रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड, पाच जणांना अटक
सातारा लोकसभेतून कोणाला मिळणार तिकीट? उदयनराजे भोसले यांच्या नावावर भाजप करणार शिक्कामोर्तब
महाविकास आघाडीचा जागांचा तिढा सुटला, सांगली लोकसभा काँग्रेस लढवणार?