Marathwada Rain Alert : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नद्यांना पूर आला असून धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, गोंदिया जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नांदेड, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, गोंदिया आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले असून नदी-नाल्यांचा प्रवाह वाढला आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत तर शहरातील सखल भाग जलमय झाले आहेत. ग्रामीण भागात उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांपुढे संकट उभं राहिलं आहे.
26
नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश पावसाचा कहर
नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. रस्ते जलमय झाले असून गोदावरी आणि आसना नद्यांची पातळी वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
36
हिंगोलीत ओढ्यांना पूर, शेतात पाणी
हिंगोली जिल्ह्यात दांडेगाव परिसरात ओढ्याला पूर आल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले आहे. पिकांचे नुकसान झाले असून काही कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.
लातूर जिल्ह्यात रेणा मध्यम प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून 2,529 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
56
बीड, परभणीमधील स्थिती
बीड जिल्ह्यात गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा आणि मांजरा नद्यांचा प्रवाह वाढला आहे. मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मांजरा आणि माजलगाव धरणातून मोठा विसर्ग माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडून 42,000 क्युसेक्स आणि मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडून 27,166 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.
परभणीत पुन्हा पावसाचा कहर परभणी जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला असून नदी-नाल्यांना पाणी आले आहे. उरलेल्या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
66
धाराशिव, गोंदिया आणि सोलापूरची स्थिती
धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यात धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
सोलापूरात पूरस्थिती कायम सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला पूर आला आहे. गावांमध्ये पाणी साचल्याने सर्पदंशाच्या घटना घडत असून एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.