Vidharbha Rain Alert : विदर्भावर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढावले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘रागासा’ चक्रीवादळ विदर्भाच्या दिशेने सरकत असून, २५ सप्टेंबरपासून अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने आता तीव्र रूप घेतले आहे. ‘रागासा’ नावाचे चक्रीवादळ विदर्भाच्या दिशेने वेगाने सरकत असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी प्रादेशिक हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यातच पावसाने विदर्भात पूरसदृश परिस्थिती निर्माण केली होती, त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
23
अलर्ट जारी, सावधानतेचे आवाहन
हवामान विभागाने नागपूर व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय शुक्रवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे आणि पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
33
मान्सून अजून सक्रिय
सध्या नैऋत्य मोसमी वारे परतीच्या टप्प्यात असल्याचे म्हटले जात असले तरी, नागपूर हवामान केंद्रानुसार हा परतीचा पाऊस नाही. मान्सून विदर्भात अजूनही सक्रिय स्थितीत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाची सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, त्याआधी ‘रागासा’ चक्रीवादळ विदर्भावर शेवटचा मोठा दणका देऊ शकते.