Maharashtra Rain Alert : मुंबईसह कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हवामान खात्याने सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत दमट उकाडा आणि ढगाळ वातावरण कायम असून, ठाणे-नवी मुंबईतही सरींचा क्रम सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. ऑक्टोबरच्या प्रखर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सततच्या सरींमुळे दिलासा मिळत आहे. मात्र, पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी आणि दैनंदिन हालचालींमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी आज (२७ ऑक्टोबर २०२५) यलो अलर्ट जारी केला आहे.
25
मुंबईत ढगाळ वातावरण आणि दमट उकाडा
काल दिवसभर मुंबईत जोरदार सरी कोसळल्या, तर काही भागांमध्ये अचानक मुसळधार पावसाचा जोर वाढला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही अशीच परिस्थिती राहणार आहे. काही भागांमध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम सरी सुरू राहतील. मुंबईचे आजचे किमान तापमान 26°C आणि कमाल तापमान 32°C इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि दमट उकाड्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो.
35
ठाणे आणि नवी मुंबईतही यलो अलर्ट
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काल काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही भागांमध्ये हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने आजसाठीही या भागांत यलो अलर्ट जारी ठेवला आहे. दिवसभर उन्हाचा पारा वाढत असला तरी अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे वातावरणात हलका गारवा जाणवत आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि पावसाळी साहित्य जवळ ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मध्यम ते जोरदार पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी आकाश ढगाळ राहिले असून, अधूनमधून उन्हाचा तडाखाही जाणवतो आहे. वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. शेतात ओलसरपणा वाढल्याने कापणी आणि इतर शेतीकामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
55
कोकण किनारपट्टीवर मुसळधार सरी; शेतकऱ्यांची कापणी अडली
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू आहेत. सततच्या पावसामुळे भात कापणीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला असून, अनेक शेतकऱ्यांनी कापणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ओलसर हवामानामुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे, त्यामुळे शेतीकामांवर परिणाम दिसून येत आहे.