Anxiety Attack : कॉफी विथ करण (Koffee with Karan) या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये करण जोहरने अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग यांच्यासमोर एक धक्कादायक खुलासा केला.
‘कॉफी विथ करण’ ( Koffee with Karan) या शोचे आठवे पर्व सुरू झाले आहे. नव्या पर्वातील पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) हजेरी लावली. या दोघांशी बातचित करताना निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने धक्कादायक खुलासा केला. ‘मी देखील डिप्रेशनचा सामना करत होतो’, असे त्यानं यावेळेस सांगितले. यामुळे एंझायटी अटॅकही आल्याचीही माहिती त्यानं दिली.
ही घटना एप्रिल महिन्यात पार पडलेल्या अंबानी कुटुंबीयांच्या NMACC कार्यक्रमात घडल्याचे त्यानं सांगितले. ‘कार्यक्रम सुरू असतानाच माझे हातपाय थरथरू लागले आणि मला खूप घाम देखील फुटला होता. मला काही तरी होतंय, हे लक्षात येताच वरुण धवन माझ्याजवळ आला. मी ठीक आहे का? अशी विचारपूस त्याने केली. मी त्याला म्हटलं मी ठीक नाहीय. यानंतर त्याने मला एका रूममध्ये नेले. मी जोरजोरात श्वास घेत होतो. असे वाटलं की मला हार्ट अटॅक येत आहे’.
'अर्धा तास त्या रूममध्ये मी आराम केला आणि त्यानंतर घरी निघून आलो. घरी आल्यानंतर मी बेडरूममध्ये जाऊन खूप रडलो. मी का रडत आहे? हेच मला समजत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सायकियाट्रिस्टची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी मला सांगितले की मला नैराश्याने ग्रासले आहे. यावेळेस त्यांनी मला मेडिटेशन करण्याचा सल्ला दिला'. करण जोहरप्रमाणेच दीपिका पादुकोणही डिप्रेशनसारख्या आजाराला बळी पडली होती.
(पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांपासून हवीय सुटका? करा हे नैसर्गिक उपाय)
प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे समस्या निर्माण होत असतात. पण नेहमीच चिंताग्रस्त, तणावग्रस्त राहिल्यास याचे वाईट परिणाम मानसिक तसंच शारीरिक आरोग्यावर होतात. यामुळे तुमच्या अन्य महत्त्वाच्या कामांमध्येही अडचणी निर्माण होऊ लागतात. आयुष्य जगणं असह्य वाटू लागते. जाणून घेऊया कोणत्या कारणांमुळे एंझायटी अटॅक येऊ शकतो आणि याची लक्षणे कशी ओळखावीत?
एंझायटी अटॅक येण्यामागील कारणे अनेक असू शकतात. शारीरिक व मानसिक आरोग्यावर ताण येऊ लागतो, त्यावेळेस शरीरामध्ये कोर्टिसोल यासारख्या स्ट्रेस हार्मोनचा स्त्राव अधिक प्रमाणात होतो. ज्यामुळे एंझायटी अटॅक येऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये अनुवांशिकता देखील कारणीभूत असू शकते. शरीरातील पोषणतत्त्वांच्या अभावामुळेही एंझायटी अटॅक येऊ शकतो.
काही संशोधनातील माहितीनुसार, शरीरात व्हिटॅमिन बी 6 आणि लोहाच्या कमतरतेमुळे एंझायटी - पॅनिक अटॅकची समस्या निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी या दोन्ही पोषणतत्त्वांचा शरीरास पुरवठा होणे आवश्यक आहे. याद्वारे शरीरात सेरोटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी वाढण्यास मदत मिळते. ज्यामुळे नैराश्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते.