
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुदोली चक परिसरातील जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध दर्शवला. सरकारने स्थगिती जाहीर करूनही जमिनीची मोजणी करण्यासाठी पथक पाठवणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहणाचा प्रयत्न झाल्यास सरकारच कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीला जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला. याशिवाय समृद्धी महामार्गावरील खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवर त्यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप करत सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचेही ते म्हणाले. तसेच पक्षांतराच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षातील खासदारांनी राजीनामा देऊनच दुसऱ्या पक्षात जावे, अन्यथा तो मतदारांशी विश्वासघात असल्याचे त्यांनी म्हटले.