
मुंबईतील IIT बॉम्बेबाहेर साहिल वाकोडेच्या मृत्यूप्रकरणी मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गायकवाड यांनी आपण शांततेच्या मार्गाने साहिल आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आलो असताना पोलिसांकडून रोखले जात असल्याचा आरोप केला. त्यांनी साहिलचा मृत्यू हा आत्महत्या नसून ‘इन्स्टिट्यूशनल डेथ’ असल्याचा दावा करत या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. IIT बॉम्बेमध्ये यापूर्वीही अशा घटना घडल्याचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरक्षात्मक उपाय आणि SOP तयार करण्याची मागणी केली. शिक्षण व्यवस्था, विद्यापीठे आणि IIT मध्ये RSS चा प्रभाव वाढल्याचा तसेच जातीय आणि धार्मिक भेदभाव होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. SC, ST आणि OBC प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची संख्या जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. साहिलच्या कुटुंबाच्या आरोपांबाबत चौकशी सुरू असून प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आहे. गायकवाड यांनी या प्रकरणाची CBI चौकशी, जबाबदारी निश्चित करणे आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनी साहिलच्या कुटुंबाशी बोलून त्यांच्या लढ्यात साथ देण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड आणि काँग्रेस व NSUIच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.