
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडन दौरा मराठमोळा आणि मराठीमय झाल्याचे सांगितले. विमानतळावर मराठी संस्कृतीचे दर्शन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अनुभवायला मिळाल्याचे त्यांनी म्हटले. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांना Commonwealth Public Leadership पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. हा पुरस्कार त्यांनी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला समर्पित केला. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मराठीत भाषण करताना सुरेश भट यांची ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही कविता सादर केल्याचे शिंदे यांनी सांगितले. लंडनमध्ये महाराष्ट्राचे राज्यगीतही गायले गेले. यावेळी महाराष्ट्र, भारत आणि UKमधील उद्योजक व गुंतवणूकदारांशी त्यांनी चर्चा केली आणि महाराष्ट्रातील उद्योग वाढवण्याचे तसेच नवीन गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. लंडनमध्ये वृषाली हरकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, मराठी भाषिक आणि मराठी शाळांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधल्याचे शिंदे यांनी सांगितले. हा विषय सर्वोच्च न्यायालयात असताना मराठी भाषिकांना त्रास आणि मराठी शाळांना अडचण होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लंडनमधील विमानसेवा विस्कळीत झाल्याने शेकडो उड्डाणे रद्द किंवा वळवण्यात आली असतानाही दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण लंडनला पोहोचलो आणि सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहिलो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.