Published : Jun 30, 2025, 11:08 AM ISTUpdated : Jun 30, 2025, 11:54 AM IST
Happy Birthday Nilesh Sable : ‘चला हवा येऊ द्या’ शो मधून प्रसिद्ध झालेला कलाकार निलेश साबळे याचा आज (30 जून) वाढदिवस आहे. यानिमित्त निलेशने चला हवा येऊ द्या शो ची सुरुवात कशी झाली आणि शोचा एकूणच प्रवास कसा होता याबद्दलचा सांगितलेला किस्सा जाणून घेऊ.
“कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न – हसताय ना? हसलंच पाहिजे!” हे वाक्य आज केवळ एक संवाद राहिलेला नाही, तर ते डॉ. निलेश साबळे यांच्या प्रेमळ, उत्साही आणि बहुगुणी व्यक्तिमत्त्वाची ओळख बनले आहे. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, सूत्रसंचालक आणि विनोदी कलाकार अशा अनेक भूमिका लीलया पेलणाऱ्या निलेश साबळे यांचा आज, ३० जून रोजी वाढदिवस आहे.
26
चला हवा येऊ द्या"ची सुरुवात
२०१४ साली झी मराठीवर सुरू झालेला 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम निलेश साबळेच्या सूत्रसंचालनामुळे आणि एकूणच कलाकार मंडळींच्या भन्नाट टायमिंगमुळे घराघरात पोहोचला. पण या शोची सुरुवात एकाच दिवशी ठरवली गेली, आणि त्यामागे एक खास रंजक किस्सा आहे – तो म्हणजे अभिनेता रितेश देशमुख याचं अप्रत्यक्ष योगदान.
36
रितेश देशमुखमुळे मिळाली सुरुवात
‘भाडिपा’च्या ‘रेडी टू लीड’ या कार्यक्रमात बोलताना निलेशने सांगितले, की रितेश देशमुख यांचा ‘लय भारी’ सिनेमा येत होता आणि त्याच्या प्रमोशनसाठी रितेश यांनी झी मराठीकडे विचारणा केली होती – हिंदीसारखाच मोठा प्रमोशनल प्लॅटफॉर्म मिळू शकेल का? अशा प्रकारचा शो त्या वेळी झीकडे नव्हता. त्याच वेळेस चॅनलकडून निलेशला फोन आला आणि दोन दिवसांत एक पूर्ण एपिसोड तयार करायचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं.
तारखा आणि कलाकार मिळवणं हे मोठं आव्हान होतं. निलेशला फक्त भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा होकार मिळाला. यावर निलेश म्हणतो, “कुशल आणि भाऊ अशी माणसं आहेत की, 'तुझ्यासाठी कायपण आणि कधीपण!'” रात्री त्यांच्या घरी जाऊन त्याच्या मुलाच्या वहीत स्क्रिप्ट लिहून तयार झालेला तो भाग, पुढे दोन एपिसोड बनला.
56
प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
या दोन भागांचं टेलिकास्ट झाल्यानंतर प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि तेव्हाच झी मराठीने या शोला नियमित रूपात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आज ‘चला हवा येऊ द्या’ केवळ एक टीव्ही शो नाही, तर मराठी हास्यविश्वातील एक परंपरा बनली आहे.
66
यशस्वी प्रवास आणि देशविदेशातील लोकप्रियता
चला हवा येऊ द्या या शोने केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशातही कार्यक्रम सादर केले. मराठी कलाकारांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. या यशामागे डॉ. निलेश साबळे यांची मेहनत, दूरदृष्टी आणि टीमवरील विश्वास मोठा आहे.