अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचा उत्साह केवळ देशातच नव्हे तर विदेशातही दिसून येत आहे. अमेरिका, ब्रिटेनमध्ये रामभक्तांकडून कार रॅली व वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे-आनंदाचे वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सर्वत्र दिवाळीसारखा साजरा केला जात आहे. अशातच विदेशातही रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त धूम पाहायला मिळाली आहे. अमेरिका, ब्रिटेनमध्ये कार रॅली आणि खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
कॅलिफोर्नियातील (California) भारतीय नागरिकांनी राम मंदिराचे बॅनर्स घेऊन कार रॅली काढली. कार रॅली गोल्डन ब्रिज (Golden Bridge) ते सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) येथील वेगवेगळ्या ठिकाणाहून काढली गेली. यादरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रभू रामांच्या गाण्यांवर नृत्याचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप आणि टेस्ला कारच्या माध्यमातून लाइट शो देखील करण्यात आला.
रामललांच्या आयुष्यावर आधारित व्हिडीओ प्रसारित
कार रॅलीवेळी डिजिटल ट्रकही होते. या ट्रकच्या माध्यमातून प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या फोटोंसह रामललांच्या आयुष्यावर आधारित व्हिडीओ प्रसारित करण्यात आले. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला प्रभू श्रीरामांच्या भक्तांनी रामललांच्या नावाचा जयघोषही केल्याचे दिसून येत आहे.
कार रॅलीचे प्रमुख आयोजक दीप्ति महाजन यांनी सांगितले की, राम भक्तांनी भगवे झेंडेही फडकवले, प्रभू श्रीरामांचे भजन आणि ढोल वाजवत उत्साह साजरा केला. याशिवाय अमेरिकेत पहिल्यांदाच भारतीयांकडून अशा प्रकारची रॅली काढण्यात आली आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदाचा मुहूर्त महत्त्वाचा
अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदाचा मुहूर्त अत्यंत शुभ आहे. काशीतील ज्योतिषाचार्य पंडित गणेश्वर शास्री द्रविड यांनी हा शुभ मुहूर्त काढला आहे. शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 08 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंदादरम्यान असणार आहे. या शुभ मुहूर्तावरच रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
आणखी वाचा :
ऑस्ट्रेलियात उभारले जातेय सर्वाधिक उंच राम मंदिर, मिळणार या सुविधा
जगभरात राम नामाचा गजर, जर्मनीतील गायिकेने मधुर आवाजात गायिले 'राम आएंगे तो अंगना' गाणे (Watch Video)