अयोध्येतील राम मंदिरातील रामललांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी अबू धाबीमधील भव्य हिंदू मंदिरांचे उद्घाटन करणार आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला मंदिराचे उद्घाटन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
UAE's First Hindu Temple : संयुक्त अरब अमिराती देशात (UAE) अयोध्येसारखे भव्य हिंदू मंदिर उभारण्यात आले आहे. 700 कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या मंदिरांचे उद्घाटन येत्या 14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते केले जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी मंदिर येत्या 18 फेब्रुवारीपासून भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.
27 एकर जमिनीवर उभारण्यात आलेय मंदिर
संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबू धाबीमध्ये (Abu Dhabi) उभारण्यात आलेल्या हिंदू मंदिराचे नाव 'बीएपीएस हिंदू मंदिर' (BAPS Temple) आहे. जे बीएपीएस संस्थेच्या (BAPS Swaminarayan Sanstha) नेतृत्वाखाली उभारण्यात आले आहे. बीएपीएस अशी एक संस्था आहे, ज्यांनी जगभरात 1100 पेक्षा अधिक हिंदू मंदिरांची उभारणी केली आहे. दिल्लीतील अक्षरधाम मंदिर देखील याच संस्थेने उभारले आहे. हिंदू मंदिर 27 एकर जमिनीवर उभारण्यात आले आहे. मंदिरासाठीची जमीन संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांनी दान दिली होती.
भारतातील कारागिरांनी उभारलेय मंदिर
अबू धाबीमधील मंदिर भारतातील कारागिरांनी उभारले आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यान समरसतेचे प्रतीक म्हणून या हिंदू मंदिराचे बांधकाम केले आहे. वर्ष 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आले असता तेव्हा या मंदिराबद्दल चर्चा झाली होती.
राजस्थानमधील गुलाबी रंगातील बलुआ दगडाचा मंदिरासाठी वापर
अबू धाबीमधील हिंदू मंदिर पश्चिम आशियातील दगडांपासून तयार करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे. याशिवाय मंदिरासाठी उत्तर राजस्थानमधील गुलाबी रंगातील बलुआ दडगाचा वापर करण्यात आला आहे.
18 लाख वीटांचा करण्यात आलाय वापर
इटली येथून मंदिरासाठी संगमरवर आणले आहे. अबू धाबीमधील मंदिर आशियातील सर्वाधिक मोठे मंदिर आहे. याची उंची 108 फूट आहे. उंची 79.86 मीटर आणि रुंदी 54.86 मीटर आहे. मंदिराच्या बांधकामासाठी पूर्णपणे 18 लाख वीटांचा वापर करण्यात आला आहे.
मंदिरातील सुंदर मूर्ती
मंदिरामध्ये अन्य सुंदर मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. मंदिरामध्ये दोन घुमट तयार करण्यात आले असून त्यांना शांती आणि सद्भाव घुमट म्हटले जात आहे. या मंदिरात स्वामीनारायण, राम, सीता, कृष्ण आणि अय्यपन यांच्यासह भारतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती देखील असणार आहेत.
बॅडमिंटनपटू सायना नेहवालची पोस्ट
बॅडमिंटनपटू सायना नेहवालने (Saina Nehwal) अबू धाबीमधील हिंदू मंदिराचे इंस्टाग्रामवर फोटो शेअर कले आहेत. या फोटोखाली कॅप्शन लिहित सायनाने म्हटले की, फार सुंदर आहे भारतीय वास्तुकला. या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची वाट पाहत आहे.
आणखी वाचा :
UPI Goes Global : फ्रान्समध्ये यूपीआय प्रणाली लाँच, भारतीय प्रवाशांना पेमेंट करणे होणार सोपे