लाडकी बहिण योजनेवर मोठी अपडेट!, ऑगस्टमध्ये अर्ज केल्यास पैसे कधी मिळणार?

माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट महिन्याचे एकत्रित ३००० रुपये राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात जमा झालेत. मात्र ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली आहे.

Rameshwar Gavhane | Published : Aug 18, 2024 6:20 AM IST / Updated: Aug 18 2024, 11:57 AM IST

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत अनेक महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत. महिलांच्या खात्यात जमा झालेले हे 3000 रुपये जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचे एकत्रित पैसे आहेत. सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी असंख्य महिला अर्ज दाखल करत आहेत. आता यावर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. यानंतर अनेक अटी, शर्थींची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केला. आता 15 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज दाखल करता आले नाही. तर काही महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला. आता या महिल्यांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार, ते जमा होणार की नाही? असे असंख्य प्रश्न महिलांना पडले आहेत. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. पुण्यात शनिवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भाषणादरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्यांना कधी पैसे मिळणार याबद्दल माहिती दिली.

पुण्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा झाला शुभारंभ

“लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात पुणे येथून होत आहे. पुणेच का असं विचारलं गेलं. पुण्यातूनच आई जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून स्वराज्याची संकल्पना शिवरायांना दिली होती, महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला, तेव्हा फुले दाम्पत्यांनी याच पुण्यापासून महिलांना अधिकार देण्यास सुरुवात केली. मुलींची पहिली शाळा याच पुण्यातून सुरु झाली. त्यामुळे पुणे हे उपयुक्त शहर आहे. राजकारणच नाही तर समाजपरिवर्तनाची भूमी पुणे आहे. आपलं सरकार हे देना बँक सरकार आहे. लेना बँक सरकार नाही. मागच्यावेळी वसुली करणारं सरकार होतं आता बहिणीला देणारं सरकार आहे. त्यामुळे पुण्यापासून सुरुवात करायची ठरवली.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

31 जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे जमा होणार

“सुरुवात केली तरी पैसे क्रेडिट करणं सुरू करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बहिणी खाली हात जाता कामा नये असं मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत 1 कोटी 3 लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले आहेत. प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. हा आमचा निर्धार आहे. 31 जुलैपर्यंतचे फॉर्म घेतले त्याचे पैसे आले. आता 31 ऑगस्टच्या फॉर्मची छाननी होईल, तेव्हा या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे येतील. ही खटाखट योजना नाही तर फटाफट योजना आहे. थेट पैसे खात्यात जातात”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

आणखी वाचा : 

खोडा घालायला आलेल्या सावत्र भावांना संधी येईल तेव्हा जोडा दाखवा : सीएम शिंदे

 

Share this article