जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट टीमला 5-स्टार हॉटेल मिळणार नाही, अशा चर्चा सुरू होत्या. यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट टीमच्या राहण्याच्या व्यवस्थेवरून सुरू असलेल्या चर्चांना बीसीसीआयने पूर्णविराम दिला आहे. परदेश दौऱ्यांवर नेहमी 5-स्टार हॉटेलमध्ये राहणाऱ्या भारतीय खेळाडूंना यावेळी ती सुविधा मिळणार नाही, अशी चर्चा होती. यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ही स्पर्धा जपानच्या नागोया शहरात होणार आहे. नागोयामध्ये चांगल्या 5-स्टार हॉटेल्सची संख्या कमी असल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. राजीव शुक्ला म्हणाले, "आयोजकांनी दिलेली राहण्याची सोय कदाचित 5-स्टार दर्जाची नसेल, पण ती आरामदायी आहे. आम्ही त्याचे व्हिडिओ आणि फोटो पाहिले आहेत. खेळाडूंना तिथे राहण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं आम्हाला वाटतं."
24
नक्की कारण काय?
खेळाडूंना टोकियो किंवा ओसाकामधील 5-स्टार हॉटेलमध्ये ठेवण्याचा पर्याय होता. पण तिथून स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायला बुलेट ट्रेननेही दीड तास लागतो. त्यामुळे, खेळाडूंचा वेळ आणि सोय लक्षात घेऊन त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी, म्हणजेच नागोयामध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडू एकाच रूममध्ये राहणार नाहीत, तर प्रत्येकाला स्वतंत्र रूम मिळेल, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
शुक्ला यांनी सांगितलं, "हॉटेलपेक्षा आमचं जास्त लक्ष मैदान, पिच आणि ड्रेसिंग रूमवर होतं." आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) टीमने आधीच जपानला भेट देऊन पाहणी केली आहे. मैदान आणि पिच समाधानकारक असून, क्रिकेट खेळण्यासाठी सर्वकाही तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
34
स्पष्टीकरण दिले
त्याचबरोबर, भारत या स्पर्धेसाठी दुय्यम संघ पाठवत असल्याच्या चर्चाही शुक्ला यांनी फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, "आम्ही आमचा सर्वोत्तम आणि प्रतिभावान खेळाडूंचा संघ पाठवत आहोत. भारत नक्कीच सुवर्णपदक जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे."
भारतीय संघ २० सप्टेंबरला जपानसाठी रवाना होईल. २२ सप्टेंबरला जपानविरुद्ध एक ऐतिहासिक टी-२० सामना खेळणार आहे. तर २८ सप्टेंबरपासून भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील प्रवासाला सुरुवात होईल.