
मुंबई : अमराठी व्यापार्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उचललेल्या आंदोलनामुळे वातावरण तापले आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. मात्र मराठी कार्यकर्त्यांनी हार मानली नाही आणि ठामपणे मोर्चा काढला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मिरा-भाईंदर येथे झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जोरदार भाषण करत आपली ठसठशीत भूमिका मांडली.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात थेट भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत येण्याची धमकी देत राज म्हणाले, "दुबे, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबवून मारू". तसेच, "महाराष्ट्रात कोणी मराठी व्यक्तीच्या अंगावर येणार असेल, तर त्याला ठेचायचं", अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. “आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही”, असं म्हणत त्यांनी हिंदी वर्चस्वावरही टीका केली.
या टीकेला निशिकांत दुबे यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं. त्यांनी राज ठाकरे यांचा हिंदीतील व्हिडीओ शेअर करत फक्त “मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी?” असं लिहिलं. अवघ्या सहा शब्दांत दिलेलं हे उत्तर मनसेवर टोला म्हणून पाहिलं जात आहे. राज यांनी हिंदीत दिलेल्या विधानाचा संदर्भ घेत दुबेंनी हे उत्तर दिलं.
यावर आता मनसेकडून काय प्रत्युत्तर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंनी अधिवेशनावरही व्यक्त केली नाराजी
राज ठाकरेंनी अधिवेशनात झालेल्या गोंधळावर भाष्य करत म्हणाले, “महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाही. सत्ताधारी आमदारच प्रश्न उपस्थित करत आहेत. अधिवेशन म्हणजे फक्त औपचारिकता उरली आहे का, असं वाटतंय.” अल"हे सगळं बाजूला टाकून मुद्दाम उथळ वाद निर्माण केले जात आहेत. जर अशा लोकांना आज माफ केलं, तर भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून होतील, तरी आश्चर्य वाटायला नको," असं गंभीर विधान करत राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली.