
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेण्याची तयारी केल्याची चर्चा रंगली आहे. स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्यामुळे मनसे नाराज असल्याचे सांगितले जात असून, या निर्णयाचा थेट परिणाम ठाकरेंच्या शिवसेनेवर होऊ शकतो. प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांच्या लढतीत सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातील चर्चेनंतरही स्वीकृत नगरसेवक पद मनसेला मिळाले नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेत तीन स्वीकृत नगरसेवक झाले असून त्यापैकी एक जागा मनसेला मिळावी, अशी अपेक्षा होती. त्याऐवजी काही प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद देण्याचा पर्याय चर्चेत होता. मात्र आता मनसे तटस्थ राहण्याच्या भूमिकेत असल्याने शिवसेनेच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रभागनिहाय संभाव्य सत्ता समीकरण पुढीलप्रमाणे —
मुंबईतील 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. पुढील तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार आहेत.
काही प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीची शक्यताही वर्तवली जात आहे.
17 पैकी सुमारे 9 प्रभाग समित्यांवर महायुतीचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित ठिकाणी काँग्रेस, समाजवादी पक्ष, मनसे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये चुरस अपेक्षित आहे. सदस्यसंख्या समसमान असलेल्या प्रभागांमध्ये क्रॉस व्होटिंग किंवा तटस्थ भूमिकेचा निर्णायक प्रभाव पडू शकतो.
प्रभाग समित्या म्हणजे स्थानिक प्रशासनाचे केंद्रबिंदू मानल्या जातात. रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था आणि स्थानिक विकासकामांवरील निर्णय या समित्यांकडे असतात. अध्यक्षपद मिळवणे म्हणजे त्या भागातील प्रशासनावर थेट प्रभाव मिळवणे होय.