
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा रोड येथील सभेत मोठा इशारा दिला आहे. राज ठाकरे आज मीरा रोड शहराच्या दौऱ्यावर आहेत.येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे शाखेचे उदघाटन केलं आहे. या सभेत येथील आजूबाजूचे नागरिक उपस्थित होते. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलं आहे.
"मुंबईतून घरातून निघालो आणि इथे पोहोचायला जवळपास 2 तास लागले. मी दरवेळेला आपल्या लोकांना सांगतो की, स्वागतामुळे वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे इथे यायला वेळ होतो. आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दामून आलो. त्यादिवशी तो घडलेला जो प्रसंग होता इथला, मीठावाल्याचा काहीतरी झाला तो भाग. कानावरती मराठी भाषा समजणार नाही तर कानाखाली बसणारच मराठी. विनाकारण काहीतरी काढत असतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"छोटा प्रसंग होता तो. मोर्चासाठी म्हणून माझे महाराष्ट्र सैनिक तिथे पाणी प्यायला गेले. तेव्हा माणसाने विचारलं की, कशासाठी मोर्चा काढताय, त्यांनी सांगितलं हिंदी सक्तीचं केलंय म्हणून. म्हणे, इथे तर हिंदीतच बोलतात म्हणे. सगळं हिंदत संभाषण सुरु होतं. त्या माणसाच्या अरेरावीमध्ये त्याच्या जी काही कानफटीत बसायचं ती बसली. लगेच इकडच्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. तुमच्या कानफटात मारली होती का? अजून नाही मारली", असं राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलं आहे.
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदी भाषा सक्तीवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. "विषय समजून न घेता, काय झालंय ते माहिती नसताना, राजकीय पक्षांच्या दबावाखाली तुम्ही दुकानं बंद करत असाल, तुम्हाला वाटतं मराठी व्यापारी नाहीयेत का? दुकानं बंद ठेवून किती काळ निभावणार आहात? शेवटी आम्ही ग्राहक म्हणून काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना? महाराष्ट्रात राहताय तर मराठी शिका, आमचं काही वैर नाही; पण मस्ती कराल तर महाराष्ट्राचा दणका नक्की बसणार," असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करणार, असं मुख्यमंत्री फडणवीस सांगत आहेत. पण मी स्पष्टपणे सांगतो, महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी सक्तीची करण्याचा प्रयत्न जरी झाला, तरी मी केवळ दुकानं नव्हे, शाळाही बंद करेन." त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, "हे सगळं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. काँग्रेसच्या काळातही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट होता. मुंबई गुजरातमध्ये जावी, हेच स्वप्न काही व्यापारी आणि नेते पाहत होते."
राज ठाकरे म्हणाले की, "सगळ्यात आधी वल्लभभाई पटेल यांनीच म्हटलं होतं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका. मोरारजी देसाईंनी गोळीबार करून मराठी माणूस मारला होता. हे सगळं सहज घडलेलं नाही. हळूहळू हिंदी सक्ती आणून मराठी जनतेचा प्रतिकार किती आहे हे तपासलं जातंय. जर कोणी विरोध केला नाही तर पुढचं पाऊल म्हणजे मुंबईचा ताबा घेऊन गुजरातला मिळवण्याचं त्यांचं जुने स्वप्न पुन्हा साकार करण्याचा प्रयत्न होईल," असाही गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला.