
मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या पायऱ्यांवर नुकताच घडलेला राडा आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणावर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या गोंधळाची तातडीने चौकशी सुरू करत नार्वेकर यांनी मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सभागृहाची प्रतिष्ठा मलीन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केले जाणार नाही.
अध्यक्षांच्या निर्णयानुसार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव टकले यांचे वर्तन हे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारे ठरले आहे. त्यामुळे दोघांवरही कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
राहुल नार्वेकर म्हणाले, “दोन्ही अभ्यागतांचे वर्तन हे विधानसभेचा अवमान असून विशेषाधिकार भंग करण्यासारखे आहे. त्यामुळे हे प्रकरण मी विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे. योग्य ती चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे.”
घटनेच्या गांभीर्याची दखल घेत अध्यक्षांनी आमदार पडळकर आणि आव्हाड यांना सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, अप्रत्यक्षपणे त्यांनी या गोंधळासाठी दोन्ही आमदारांची जबाबदारी असल्याचेही संकेत दिले आहेत.
राड्यानंतर घेतलेल्या मोठ्या निर्णयात, विधानसभाध्यक्षांनी जाहीर केले की आता विधानभवन परिसरात मंत्री, आमदार आणि शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. खासदारांचे किंवा आमदारांचे कार्यकर्ते, समर्थक अथवा इतर अभ्यागत यांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर, अध्यक्षांनी मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. खात्याशी संबंधित प्रश्न, तक्रारी अथवा भेटींसाठी मंत्रालयातच संवाद साधावा, अशी सूचना दिली आहे.
या घटनेनंतर विधानसभाध्यक्षांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. लवकरच संसदेप्रमाणेच विधानसभेतही नीतीमूल्य समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती आमदारांच्या वर्तनावर, आचारसंहितेवर आणि सभागृहातील शिस्त यावर लक्ष ठेवेल.
“आमदारांचे आचरण आदर्शवत असावे आणि लोकशाहीच्या मंदिरात योग्य वागणूक अपेक्षित आहे. यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून आम्ही सर्व पावले उचलणार आहोत,” असे नार्वेकर यांनी ठामपणे स्पष्ट केले.
राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या पायऱ्यांवर घडलेली हाणामारी राज्यातील लोकशाहीच्या प्रतिष्ठेस मोठा धक्का देणारी होती. मात्र विधानसभाध्यक्षांनी घेतलेली कठोर भूमिका आणि संभाव्य सुधारणा यामुळे यापुढील घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा आहे.