Mumbai Rain : कोकण किनारपट्टीसह मुंबईत पावसाने जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथे यलो अलर्ट तर रायगड-रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
25
मुंबईत रात्रीपासून मुसळधार सरी
मुंबईत मध्यरात्रीपासूनच पावसाच्या जोरदार सरी सुरू झाल्या असून सकाळपासूनही अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आजचे हवामान दमट राहणार असून कमाल तापमान 30 अंश सेल्सियस व किमान तापमान 25 अंश सेल्सियस असेल.
35
ठाणे व नवी मुंबईत पावसाचा जोर कायम
मागील दोन दिवसांपासून ठाणे आणि नवी मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाचे प्रमाण सुरू आहे. आजही हवामान विभागाने या दोन्ही ठिकाणांसाठी यलो अलर्ट दिला आहे. सकाळपासून काही भागांत सरी बरसत असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दमट वातावरणामुळे उकाडा जाणवेल, मात्र सरींमुळे काहीसा गारवा देखील मिळणार आहे.
पालघर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाची परिस्थिती सुरूच आहे. हवामान विभागाने आज येथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट दिला आहे. सकाळपासून काही भागांत रिमझिम पाऊस झाला असून दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 24 अंश राहील.
55
रायगड-रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, सिंधुदुर्गातही सरींचा अंदाज
कोकण किनारपट्टीवरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत आज पावसाचा जोर जास्त राहणार आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासूनच येथे सरींनी जोर धरला असून दिवसभर त्यात वाढ होईल. सिंधुदुर्गातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.