धक्कादायक! बदलापुरात ट्रेनच्या डब्याचा दरवाजा केला बंद, ऐन गर्दीच्या वेळेस प्लॅटफॉर्मवर उडाला मोठा गोंधळ

Mumbai Local: बदलापूर रेल्वे स्थानकात कर्जत-सीएसएमटी लोकलच्या दुसऱ्या श्रेणीतील महिलांच्या डब्याचे दरवाजे बंद करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (12 डिसेंबर, 2023) घडला. या प्रकरणी आता रेल्वे पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

Chanda Mandavkar | Published : Dec 14, 2023 6:45 AM IST / Updated: Dec 26 2023, 11:47 AM IST

Mumbai Local Ladies Compartment : मुंबईपासून 70 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बदलापूर (Badlapur) रेल्वे स्थानकात मंगळवारी (12 डिसेंबर, 2023) सकाळी प्रवाशांनी गोंधळ घातला. यावेळी लोकलमध्ये प्रवाशांना चढू न देण्यासाठी लोकलच्या दुसऱ्या श्रेणीतील महिला डब्याचे दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती एका रेल्वे पोलिसांच्या (RPF) अधिकाऱ्याने दिली.

गर्दीच्या वेळेस मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांमध्ये लोकलमध्ये चढण्यावरून वाद होत राहतात. रेल्वे संरक्षण दलाच्या हस्तक्षेपानंतर हा प्रश्न सोडावण्यात आला. पण महिलांच्या डब्याचे दरवाजे बंद करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे.

नेमके काय घडले?

मंगळवारी सकाळी 7 वाजून 19 मिनिटांची सीएसएमटीकडे (CSMT) जाणाऱ्या फास्ट लोकलच्या (Fast Local) उत्तरेकडील महिलांच्या डब्यातील प्रवाशांनी सकाळी आठ वाजताच्या आसपास मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर स्थानक येण्याआधीच लोकलचे दरवाजे आतमधून बंद केल्याचे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याने (Commuter Rights Activist) सांगितले.

यामुळे बदलापूर स्थानकात लोकलची वाट पाहात उभ्या राहिलेल्या प्रवाशांना आतमध्ये चढता आले नाही. या सर्व गोंधळादरम्यान पुरुषांच्या एका डब्यातून कोणीतरी अलार्म साखळी खेचली.

या प्रकरणाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामध्ये प्रचंड गर्दी होत प्लॅटफॉर्मवरील महिला डब्यात चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. अखेर रेल्वे संरक्षण दलाच्या हस्तपेक्षानंतर महिला डब्याचे दरवाजे उघडण्यात आल्याचे वरिष्ठ रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.

रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासून पाहिले जात आहेत. या प्रकरणी ज्या प्रवाशांनी महिला डब्याचे दरवाजे बंद केले त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. याशिवाय या प्रकरणी अज्ञात प्रवाशांच्या विरोधात रेल्वे कायद्यातील कमल 155(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा: 

Mumbai: कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात नवऱ्याचा बायकोवर चाकू हल्ला, आरोपीला पोलिसांकडून अटक

Mumbai Crime : कुरियर कंपनीत 4 कोटी रूपयांची चोरी, पोलिसांनी 30 तासात चोरट्यांना ठोकल्या बेड्या

Dog Attack in Mumbai : 10 वर्षीय मुलीवर पाळीव कुत्र्याचा हल्ला, गंभीर जखमी मुलीला पडले 45 टाके; FIR दाखल

Share this article