मागील १५ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी जिवाचे रान करणारे मनोज जरांगे पाटील आज घराघरात चर्चेत आहेत. या लढ्यात त्यांनी स्वतःची जमीनही विकली. एकेकाळी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष राहिलेले जरांगे पाटील आज मराठा समाजाचे आक्रमक नेते झाले आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा त्यात केला आहे. त्यांनी घरादारावर चक्क तुळशीपत्र ठेवले आहे. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी या आंदोलनात स्वतःला झोकून दिले आहे.
बारावीनंतर शिक्षण सोडून उदरनिर्वाहासाठी हॉटेलवर काम करणारा हा तरुण, समाजकारणासाठी आयुष्य झोकून देईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण काळाच्या ओघात त्यांचे जीवन पूर्णपणे समाजाच्या सेवेसाठी वळलं.
26
दुचाकी-चारचाकी नसलेला नेता, पण लाखोंचा ताफा सोबत
मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आजही ना दुचाकी आहे ना चारचाकी वाहन. साध्या पत्र्याच्या घरात राहणारे हे नेते, जेव्हा अंतरवाली सराटीतून "चलो मुंबई"चा नारा देत निघाले, तेव्हा त्यांच्या मागे हजारो वाहनांचा आणि लाखो मराठ्यांचा ताफा उभा राहिला.
२७ ऑगस्ट रोजी सुरू झालेला त्यांचा मोर्चा मुंबईत पोहोचताच राज्यभरातच नव्हे तर देशभरात त्यांच्या नावाची चर्चा रंगू लागली.
36
बीडमधून जालना, शिक्षण सोडून चळवळीत प्रवेश
मनोज जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातील. वडील जवळपास वीस वर्षांपूर्वी जालन्यात स्थायिक झाले. शिक्षण बारावीनंतर थांबले, पण समाजकारणात रुची वाढली. उदरनिर्वाहासाठी हॉटेलवर काम केले आणि एकामागून एक ३० हून अधिक आंदोलने केली.
आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. २०१३ मध्ये त्यांनी ‘शंभुराजे’ हे नाटक बीड, जालना, अंबड, शहागड येथे आयोजित केले. मात्र जालना येथील प्रयोगादरम्यान अपघातात हत्ती आणि दोन घोडे मृत्युमुखी पडले. त्यामुळे केस झाली, नुकसानभरपाईचा भार आला आणि शेवटी जरांगेंना स्वतःची जमीन विकावी लागली.
56
काँग्रेसपासून शिवबा संघटनेपर्यंत
मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काँग्रेसमध्ये काम केले. ते जालन्यात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही राहिले. पण विचारभिन्नतेमुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि राजकारणातून बाहेर पडले. यानंतर त्यांनी ‘शिवबा संघटना’ स्थापन करून मराठा समाजाचे प्रश्न मांडण्यास आणि सोडवण्यास सुरुवात केली.
66
एका शब्दावर लाखो मराठे मुंबईत
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लाखो मराठ्यांना आवाहन केले. त्यांनतर लाखोच्या संख्येने गावागावातील मराठे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी मुंबई जाम केली आहे. मुंबईत पाय ठेवून दाखव म्हणणार्या नेत्यांना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे.