
Women Reservation Bill Controversy : संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर महिला विरोधी असल्याचा आरोप केल्यानंतर आता विरोधी पक्षांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर तीव्र टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. “काल फडणवीस रेटून खोटं बोलत होते,” असा गंभीर आरोप करत त्यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत सत्ताधाऱ्यांची भूमिका विरोधाभासी असल्याचे म्हटले. 2023 मध्ये विधेयक मंजूर झाल्याचा उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अंधारे यांनी 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि फडणवीस यांनी केलेल्या ट्विटचा दाखला देत प्रश्न उपस्थित केला. “त्या वेळी हे विधेयक ऐतिहासिक असल्याचे सांगितले गेले, मग आता तेच विधेयक विरोधकांमुळे पडले असे कसे म्हणता?” असा थेट सवाल त्यांनी केला. यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतील विसंगती अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
अंधारे यांनी या वादात ऐतिहासिक संदर्भ देत 1951 सालचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, महिला हक्कांसाठी मांडलेल्या विधेयकाला विरोध झाल्यानंतरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला होता. “महिलांसाठी तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहात का?” असा थेट सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला.
फडणवीसांनी विधेयकाबाबत ‘भ्रूणहत्या’ हा शब्द वापरल्यावर अंधारे यांनी त्यावरही आक्षेप घेतला. “या शब्दाचा अर्थ आणि गांभीर्य समजून घ्यायला हवे,” असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भाषेवरही टीका केली.
अंधारे यांनी पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा संदर्भ देत फडणवीसांना आव्हान दिले. “गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड ही पुस्तके आरएसएसच्या कार्यक्रमात वाचणार का?” असा सवाल करत त्यांनी विचारधारात्मक भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.