
Nagpur Smart City Case : नागपूर स्मार्ट सिटी प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि पोलिस विभागाने क्लीन चिट दिली आहे. या दोन्ही यंत्रणांनी स्वतंत्र चौकशी करून कोणताही गैरव्यवहार आढळला नसल्याचा अहवाल दिला असून, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती जाहीर केली.
भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुमारे ₹20 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत लक्षवेधी सूचना मांडली होती. या आरोपांनंतर ईओडब्ल्यू आणि पोलिस विभागाकडून स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीअंती मुंढे यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात स्पष्ट केले की, मुंढे यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाचे CEO म्हणून नियुक्ती तत्कालीन आयुक्तांनी केली होती आणि संबंधित कामांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांची कार्योत्तर मंजुरी होती. ₹20 कोटींच्या बिलाबाबत योग्य प्रक्रिया राबवली गेली असून कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही, असा निष्कर्ष दोन्ही तपास यंत्रणांनी काढला आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटी प्रकल्पातील दोन महिला अधिकाऱ्यांशी संबंधित तक्रारीवरून महिला आयोगाकडे स्वतंत्र चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अहवाल महिनाभरात अपेक्षित असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
मुंढे यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदारांवर निशाणा साधला. “चौकशी झाली, निर्दोष आढळले, तरीही समाधान नसेल तर प्रकरण ईडी, सीबीआयकडे पाठवा. स्पेशल फोर्स नेमा आणि एकदाचा सोक्षमोक्ष करा,” असे टोले त्यांनी विधानसभेत लगावले. विशेष म्हणजे, याआधीच्या दिवशी वडेट्टीवार यांनी सभागृहात मुंढे यांची बाजू घेतली होती.