BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात

Published : Dec 12, 2025, 09:27 AM IST
BMC Elections 2025

सार

BMC Elections 2025 : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत महापालिका निवडणूक 2025 महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय झाला. 

BMC Elections 2025 : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत महायुतीच्या पुढील रणनीतीवर निर्णायक चर्चा झाली. नागपूर येथील देवगिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढवण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिकांमधील सत्ता समीकरणे आणि जागावाटप यावर प्राथमिक तोडगा निघाल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यातील ठाणे, कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची खात्री पटली आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. या भागातील स्थानिक राजकीय समीकरणे पाहता घटकपक्षांमध्ये अजून चर्चा सुरू राहणार आहे.

महापालिकांबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांची एक संयुक्त कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला कमिटीमार्फत ठरवला जाईल. दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांचा समन्वय राखत निवडणुकीची तयारी जोरात करण्याच्या तयारीत आहेत. बैठकीत महायुती म्हणून निवडणूक लढण्याबाबत अत्यंत सकारात्मक वातावरण दिसून आले.

दरम्यान, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये मोठा वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आला होता. प्रचारसभांमध्ये दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिकांमध्ये एकत्र येणे महायुतीसाठी महत्त्वाचा राजकीय टप्पा ठरणार आहे.

याआधीच 8 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्रित रण.नीती कशी असावी यावर चर्चा झाली. विशेषतः मुंबई महापालिका आणि महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये युती आवश्यक असल्याचे मत एकमुखाने नोंदवले गेले. त्यानंतर पुढील बैठकीचे नियोजन करण्यात आले आणि त्याच अनुषंगाने रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचे सांगितले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Shivraj Patil Chakurkar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन
Satbara Utara : सातबारा उताऱ्यात या नोंदी दिसल्या तर सावध! जमीन जप्तीपासून कारवाईपर्यंत मोठे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती