
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच, शिवसेनेचे माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी दिलेल्या एका खळबळजनक वक्तव्याने खासी चर्चा रंगली आहे. राज ठाकरे यांच्या घातपाताचा कट उद्धव ठाकरेंनी रचल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कदम म्हणाले, आम्ही कणकवलीला चाललो असताना पोलीस अधिकाऱ्यांनी रस्ता बदलण्यास सांगितलं. कारण राज ठाकरे यांच्या घातपाताचा प्लॅन होता, आणि तो प्लॅन उद्धव ठाकरेंनीच केला होता, अशी माहिती राज ठाकरे यांनाही होती.कदमांचा पुढचा आरोप अधिक गंभीर होता. “राज ठाकरे यांना राजकारणातून संपवण्याचा डाव सुरू होता. त्यांनी केवळ पुणे आणि नाशिक हे दोन जिल्हे मागितले होते. पण उद्धव ठाकरेंनी नकार दिला. तेव्हा महाराष्ट्र कुठे गेला होता?”
राज ठाकरेप्रती आपलं प्रेम व्यक्त करत कदम म्हणाले, “मी राजसाहेबांचा चाहता आहे. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो. पण उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय योग्य आहे का, हे त्यांना स्वतःला विचारायला हवं.”‘एक म्यान में दोन तलवारी नहीं रह सकती’ या उद्धव ठाकरेंच्या 2004-05 मधील विधानाचा दाखला देत, कदम म्हणाले, “राज ठाकरे यांनी मला आणि बाळा नांदगावकर यांना पाठवून समेटाची इच्छा व्यक्त केली होती, पण उद्धव ठाकरेंनी स्पष्ट नकार दिला होता. मग तेव्हा महाराष्ट्राचं हित कुठे होतं?”
मुंबईतील मराठी जनतेबाबत चिंता व्यक्त करत, कदम म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या हातात पुन्हा महानगरपालिका गेल्यास, जो काही 10 टक्के मराठी माणूस मुंबईत राहिला आहे, तोही बदलापूर-कल्याणच्या बाहेर फेकला जाईल. लालबाग, गिरगाव, दादर हे मराठीबहुल भाग राहिले नाहीत.”कदम पुढे म्हणाले, “राज ठाकरे यांचा राजकारणातून बळी जाईल अशी मला भीती वाटते,” असे सांगून त्यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर टीका केली.
नरेंद्र मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, पण या दोघांनी मिळून विजयोत्सव का साजरा केला नाही, असा सवाल करत रामदास कदम यांनी राज ठाकरे यांच्याकडून याचे उत्तर मागितले.या संपूर्ण प्रकरणामुळे राज-उद्धव संबंध पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भविष्यात दोन्ही नेत्यांमध्ये समेट होईल की संघर्ष उफाळून येईल, याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.