
मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेवरून सुरू झालेला वाद आता चांगलाच राजकीय वळण घेत आहे. एका व्यापाऱ्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्याशी वाद घालून मारहाण केली, अशी तक्रार समोर आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, मात्र मनसेने या मोर्चामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि इतर नेत्यांवर मोर्चा घडवून आणल्याचा आरोप करत, “हा मराठी माणसाच्या विरोधात घडवलेला प्रकार आहे,” असे वक्तव्य केले आहे.
दरम्यान, मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून थेट इशारा देताना, “बेपारी आहात बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात मराठीचा अपमान केलात तर कानाखाली बसेल. बाकी मेहता-बिहता नी चड्डीत राहायचं. तूर्तास एवढंच,” असे ट्वीट केलं. त्यांच्या या ट्वीटमुळे विवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावर प्रत्युत्तर देताना आमदार नरेंद्र मेहता यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं की, “मराठीचा अभिमान नक्कीच आहे, पण माणुसकीच्या मर्यादा विसरून नाही. मीरा-भाईंदरमध्ये एका जैन/मारवाडी व्यापाऱ्याला फक्त मराठीत न बोलल्यामुळे मारहाण झाली, हे दुर्दैवी आहे.” त्यांनी संबंधित घटनेबाबत कडक कारवाईची मागणी केली आहे.
मेहता पुढे म्हणाले की, मराठी भाषेचा प्रचार हा सहिष्णुतेने, प्रेमाने आणि समजुतीने होणं आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या भाषेच्या निवडीवरून त्याच्यावर हल्ला होणं हे महाराष्ट्राच्या सहिष्णु परंपरेला धक्का देणारं आहे. “मी या कृत्याचा तीव्र निषेध करतो,” असे त्यांनी म्हटले.या सगळ्या घडामोडींमुळे मराठी विरुद्ध इतर भाषिक असा वाद पेटण्याची शक्यता आहे, तर यामागे राजकीय स्वार्थाचे गणित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेतं, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट आणि स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, "महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल. ‘मराठी येत नाही’ असं सांगून कोणी वाचणार नाही. पण कायदा हातात घेणं योग्य नाही." "मराठी ही महाराष्ट्राची शान आहे. कोणालाही ती अवहेलना करता येणार नाही. मात्र कायदा हातात घेणं योग्य नाही. ज्यांनी मारहाण केली त्यांना आम्ही समज दिली आहे की अशा घटना घडल्यास पोलीसांत तक्रार करा. हिंसाचार हा मार्ग नाही." ते पुढे म्हणाले, "इतर भाषांचा अवमान करायचा नाही. पण जर कोणी मराठीचा अपमान करत असेल, तर तो आम्ही कधीही सहन करणार नाही."
नक्की काय घडले?
मीरा रोडमधील एका हॉटेलमध्ये तिन्ही मनसे कार्यकर्ते गेले असता, तिथल्या मालकाने मराठीत संवाद साधण्यास अडथळा येत असल्याचं सांगितलं. मालकाने अत्यंत शांतपणे, "मराठी शिकवली तर मी बोलेन" असं सांगितलं. मात्र, यावर कार्यकर्ते संतापले आणि त्याच्याशी वाद घालत हिंदीतच ‘मराठी बोल’ असा दम देत त्याला मारहाण केली. हॉटेल मालकाच्या चेहऱ्यावर आणि कानांवर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ स्थानिक पत्रकार सचिन गुप्ता यांनी पोस्ट केला.