
Pune : पुण्यातील खडकवासला येथे असलेल्या प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संस्थेतील एका विद्यार्थ्याचा पोहण्याच्या सरावादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव आदित्य यादव (वय 18) असे असून, 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सुमारास 5 वाजता ही घटना घडली. ही गेल्या महिन्याभरातील दुसरी घटना असल्याने एनडीएमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एका महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने कॅम्पसमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वी अंतरिक्ष कुमार या 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. आता आदित्य यादवच्या मृत्यूमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थिती, प्रशिक्षणाचा ताण आणि संस्थेतील सुरक्षाव्यवस्था याबद्दल अनेक शंका उपस्थित होत आहेत.
10 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अंतरिक्ष कुमार या विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच एनडीए प्रशासनाने तातडीने उत्तमनगर पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता.
या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात होता का, शैक्षणिक दबावाखाली होता का, याचा शोध पोलिस घेत आहेत. तपासासाठी पोलिसांनी मित्र, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
महिन्याभरात दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे एनडीए प्रशासनावर ताण वाढला आहे. संस्थेतील सुरक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी मानसिक आधार प्रणाली कितपत प्रभावी आहे, याचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनांमुळे देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही चिंता पसरली आहे.