Navi Mumbai Fire : नवी मुंबईत भीषण आग; 84 वर्षीय महिलेसह एकाच कुटुंबातील दांपत्य आणि चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Published : Oct 22, 2025, 09:45 AM IST
navi mumbai fire

सार

Navi Mumbai Fire : नवी मुंबईच्या वाशी परिसरातील रहेजा रेसिडेन्सी इमारतीत दिवाळीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून १० जणांना गुदमरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Navi Mumbai Fire : दिवाळीच्या उत्साहात नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली. वाशी सेक्टर १४ येथील रहेजा रेसिडेन्सी या १२ मजली उच्चभ्रू इमारतीत सोमवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यांवर धुराचे प्रचंड प्रमाण पसरले आणि अनेक रहिवासी गुदमरले. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले.

वृद्ध महिलेसह चार जणांचा मृत्यू

या आगीत बाराव्या मजल्यावर राहणारे सुंदर बालाकृष्णन (४४), त्यांची पत्नी पूजा राजन (३९) आणि मुलगी वेदिका (६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहा वर्षांच्या वेदिकाला जग पाहण्याआधीच मृत्यूने कवटाळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच दहाव्या मजल्यावर राहणाऱ्या ८४ वर्षीय कमला जैन या अंथरुणाला खिळलेल्या महिलेसुद्धा आगीतून बाहेर पडू शकल्या नाहीत.

कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न निष्फळ

कमला जैन या त्यांच्या मुलगा महावीर, सून भावना आणि नातू कृष्ण यांच्यासोबत राहत होत्या. आगीच्या वेळी हे सर्व घरातच होते. आग लागल्यावर घाबरलेल्या कुटुंबीयांनी वरच्या टेरेसकडे पळण्याचा प्रयत्न केला, मात्र वृद्ध महिलेला हलवता न आल्याने त्यांना वाचवता आले नाही. दरम्यान, इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील १० रहिवाशांना गुदमरल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सांगितले की, "आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दिवाळीच्या दिव्यांमुळे किंवा एसीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असण्याची शक्यता आहे." विद्युत सुरक्षा विभागाचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

वीजपुरवठा खंडित, रहिवाशांची धावपळ

इमारतीचे अर्धवेळ व्यवस्थापक संजय उबाळे यांनी सांगितले की, “आगीदरम्यान वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे धुरामुळे रहिवाशांना गुदमरल्यासारखं झालं. काहींनी टेरेसकडे धाव घेतली, पण धुरामुळे परिस्थिती बिकट झाली.” या भीषण घटनेने वाशी परिसरात हळहळ पसरली असून प्रशासनाने सखोल चौकशी सुरू केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट