
नवी मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह आसपासच्या भागांत कोरडे दिवस संपून आता जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (23 ऑक्टोबर) सकाळपासूनच मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण आणि दमट हवा होती, मात्र दुपारी जोरदार सरी कोसळू लागल्या. विशेषतः नवी मुंबईतील खारघर, वाशी आणि बेलापूर भागात सायंकाळपर्यंत मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळाला.
नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेली महिला क्रिकेट सामना या जोरदार पावसामुळे थांबवावी लागली. मैदानावर पावसापासून बचावासाठी त्वरित कव्हर टाकण्यात आले. सामान्यतः ऑक्टोबरच्या उत्तरार्धात पावसाचा जोर कमी होतो, परंतु यंदा हवामानात अचानक बदलामुळे पावसाने पुन्हा जोर पकडला आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत मुसळधार पावसाबरोबरच विजांचा कडकडाट आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.