बीड: केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चर्चेत आहेत. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही आरोपी अजूनही फरार आहेत. पोलीस दलातर्फे आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता पोलिसांकडून या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे यांना फरार घोषीत करण्यात आलं आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्यांचं नाव अत्यंत गुप्त ठेवण्यात येईल व योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
बीड पोलिसांनी जारी केलेले प्रसिद्धी पत्रक:
सरपंच देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.या घटनेला २४ दिवस झाले तरी मुख्य आरोपीसह ३ आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही. या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६), कृष्णा शामराव आंधळे (वय ३०), सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय २३ वर्ष ) हे अद्यापही फरार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेला वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आहे. त्याला केज येथे आणण्यात आले आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायाधिशांनी त्याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. सीआयडीने वाल्मिक कराडची कसून चौकशी सुरू केली आहे. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत. वाल्मिक कराड नव्हे तर त्याच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली.
आणखी वाचा-