मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गाडीच्या डब्याची काच फुटली गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Vande Bharat Express Stone Pelting : मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेऊरजवळ वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची बातमी आहे. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-11 डब्याची काच फुटली गेली. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.
गुरुवारी रात्री मुंबईहून निघालेली वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर येथे आली असता काही अज्ञातांकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली. गाडीवर दगडफेक का केली आणि कोणी केली याबद्दलचा अधिक तपास स्थानिक पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे.
वर्ष 2023 मध्येही दगडफेक झाल्याचे प्रकार दोनदा उघडकीस आले होते. सोलापूरवरुन निघालेली वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्थानकातून पुढे निघाली असता तिच्यावर दगडफेक करण्यात आली होती. यावेळीही गाडीची काच फुटली गेली होती. याशिवाय पुण्यातील शिवाजीनगर परिसरातही वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाली होती.
दरम्यान, 10 फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेवर सीएमएमटी-शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता.
आणखी वाचा :
नागपूर : शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला देणाऱ्या आई-वडिलांची तरुणाने केली हत्या