जळगावमध्ये भर रस्त्यात आदिवासी महिलेची प्रसूती; अंजली दमानिया यांचा संताप

Published : May 29, 2025, 01:01 PM IST
Pregnant Women Delivery on Road

सार

Pregnant Women Delivery on Road : जळगावात एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. वैजापूर गावाजवळ रस्त्यावरच एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे. संताबाई बारेला असे या महिलेचे नाव असून, त्या बोरमळी गावातील रहिवासी आहेत.

ही घटना घडली तेव्हा कोणतीही शासकीय वैद्यकीय मदत उपलब्ध नव्हती. वैजापूर गावातील महिलांनी प्रसंगी पुढाकार घेत संताबाई यांची सुरक्षित प्रसूती केली. घटनास्थळाच्या जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची (PHC) अंतर फक्त एक किलोमीटर असूनही, तब्बल अडीच तास कोणताही डॉक्टर अथवा आरोग्य कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नाही, हे विशेष लक्षवेधी ठरलं आहे.

अंजली दमानिया यांचा संतप्त सवाल

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "फोन करूनही ना डॉक्टर आले, ना नर्स! रस्त्यावर प्रसूती करून दगडाने नाळ तोडावी लागते ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी, बाळंतीणीला नुकसानभरपाई मिळावी आणि वैजापूर आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी अँब्युलन्स असावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, प्रशासनावर संताप

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. अनेकांनी आरोग्य व्यवस्थेच्या अपयशावर ताशेरे ओढले आहेत. ज्या महिलांनी प्रसूतीस मदत केली, त्यांनीही संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

 

 

जिल्हाधिकाऱ्यांची पायपीट करत भेट

घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह खैऱ्यापाडा येथे भेट दिली. त्यांनी चिखलमय, डोंगराळ मार्गावरून ७ किलोमीटरचा पायी प्रवास करत संताबाई बारेला व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संपूर्ण घटनेचा आढावा घेत प्रशासनाने ही गंभीर बाब मानून तातडीने उपाययोजना करण्याची घोषणा केली आहे.

प्रतिभा शिंदे यांचा प्रशासनावर हल्लाबोल

या घटनेवर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. “दोषींवर वेळीच कारवाई होत नाही म्हणूनच अशा घटना पुन्हा पुन्हा घडतात,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाची तीव्र शब्दांत कानउघाडणी केली.

आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या घटनेमुळे दुर्गम आदिवासी भागांतील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. अजूनही अशा भागांमध्ये आरोग्य सेवा पोहोचत नसल्याने बाळंतीण व नवजात बालकाच्या जीवावर बेतणाऱ्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Satbara Utara : सातबारा उताऱ्यात या नोंदी दिसल्या तर सावध! जमीन जप्तीपासून कारवाईपर्यंत मोठे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जमीन वापर नियमांत ऐतिहासिक बदल! ‘सनद’ची अनिवार्यता रद्द; नागरिक–बिल्डर्स–जमीनधारकांना मोठा दिलासा