राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अलर्ट जारी

Published : May 29, 2025, 11:13 AM IST
Kerala Monsoon

सार

महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधी दाखल झाला आहे. यामुळे राज्यातील ठिकठिकाणी तुफान पावसाच्या सरी बरसताना दिसून येत आहेत. अशातच हवामान खात्याने काय अंदाज व्यक्त केलाय याबद्दल जाणून घेऊया.

Maharashtra Weather Update : राज्यात यंदा मान्सून वेळेआधी म्हणजेच तब्बल १२ दिवस आधी दाखल झाला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं असून, सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे यंदा वारे अधिक वेगाने सरकत आहेत. परिणामी, मागील पाच दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झालेला असला तरी पुढील चार दिवस मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा धोका कायम

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अजूनही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून शेतकरी आणि मच्छिमारांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळावं, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. ३० मेपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट

जालना, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील.

6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका

चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोंदिया या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या भागांत ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील ५-६ तास या जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील.

जालना जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

जालन्याच्या बदनापूर तालुक्यात काल ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे अनेक फळबागांचे नुकसान झाले आहे. अनेक विहिरी खचल्या असून जमिनीवरील माती वाहून गेली आहे. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि आमदार नारायण कुचे यांनी संयुक्त पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोकण किनारपट्टी भागात नदीनाले भरून वाहत आहेत.

राज्यभरात हवामानातील या बदलत्या स्थितीमुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे लक्ष ठेवणं आणि आवश्यक खबरदारी घेणं हे अत्यावश्यक ठरत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Satbara Utara : सातबारा उताऱ्यात या नोंदी दिसल्या तर सावध! जमीन जप्तीपासून कारवाईपर्यंत मोठे परिणाम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
जमीन वापर नियमांत ऐतिहासिक बदल! ‘सनद’ची अनिवार्यता रद्द; नागरिक–बिल्डर्स–जमीनधारकांना मोठा दिलासा