
मुंबई : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी दुपारनंतर पाऊस थांबला असला तरी या काळात अनेक दुर्घटना घडल्या असून पाच जण पुरात वाहून गेले, तर झाड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
नागपूरमध्ये दोन जण पूरात वाहून गेले
कळमेश्वर येथील बोरगाव उगले परिसरात १८ वर्षीय कार्तिक शिवशंकर लाडसे हा युवक बुधवारी पहाटे गावातील नाला पार करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. शोधमोहीमीनंतर त्याचा मृतदेह सापडला. तसेच सावनेरमधील बोरगाव बुजुर्ग येथे अनिल हनुमंत पानपत्ते (३५) हे नाला पार करताना वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.
वर्धा, यवतमाळ, गडचिरोलीतील परिस्थिती
वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील बोदरठाण येथे प्रफुल्ल शेंद्रे (३५) हे नाल्यात वाहून गेले. तर यवतमाळ येथे झरी-जामणी तालुक्यातील धानोरा येथील नाल्यातून जाताना सतीश दुर्गावार (३५) वाहून गेले. त्यांचा शोध अद्याप सुरू आहे. याशिवाय गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यात देशपूर येथील राजू तुमराम हे शेतावरून घरी परतत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.
गोंदियात झाड कोसळले, कारमधील २ ठार, ३ जखमी
गोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेले झाड एका कारवर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. वासुदेव मसाराम खेडकर (६०) आणि आनंद मनिराम राऊत (५०) यांचा मृत्यू झाला आहे. तर रितिक राजेश दिघोरे (२२), राजू चौरागडे (४६) आणि अनिल चौधरी (४६) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सडक-अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रस्ते बंद, रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील जनुना वरुडबिबी येथे मुसळधार पावसामुळे चिखलामुळे रस्ता बंद झाला होता. त्यामुळे बाबुराव मेंढके (६७) या वृद्ध रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात पोहचवावे लागले. ही घटना प्रशासनाच्या अपयशावर बोट दाखवत आहे.
हवामान खात्याकडून अलर्ट
हवामान खात्याने नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीला रेड अलर्ट जारी केला आहे. तर घाट विभाग आणि पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भातील पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी नागरिकांनी प्रवास करणे टाळावे. बचाव कार्यासाठी मदत करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.