Mira Bhayandar Police Commissioner : मोर्चाला परवानगी नाकारणे भोवले, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली!

Published : Jul 09, 2025, 07:00 PM IST
Mira Bhayandar Police Commissioner

सार

मिरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी निकेत कौशिक यांची नियुक्ती झाली. ही बदली अमराठी व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या मोर्चा, त्यानंतरच्या मराठी स्वाभिमान मोर्चावरील पोलिसांच्या कारवाईनंतर झाली.

मिरा रोड : राज्यातील गृह विभागाने बुधवारी शासन आदेश जारी करत ही माहिती दिली. मिरा-भाईंदरचे विद्यमान आयुक्त मधुकर पांडे यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी, सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असलेले निकेत कौशिक यांची मिरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

मधुकर पांडेंच्या बदलीमागील कारण काय?

या बदलीमागे मिरा-भाईंदरमध्ये नुकत्याच घडलेल्या घटना कारणीभूत ठरल्या आहेत. अमराठी दुकानदाराला मनसेने मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मारहाण केल्याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी 3 जुलै रोजी पोलीस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चाला कोणतीही परवानगी नसताना तो काढण्यात आला होता आणि त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, असे आरोप होते.

याला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी, ज्यात मनसेसह मराठी एकीकरण समिती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आदी पक्षाचे नेते-कार्यकर्ते सहभागी होणार होते, त्यांनी मंगळवारी (8 जुलै रोजी) 'मराठी स्वाभिमान मोर्चा'चे आयोजन केले होते. हा मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून निघणार होता. मात्र, मोर्चा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

मराठी भाषिकांना मोर्चाची परवानगी नाकारण्यात आली, इतकेच नाही तर मोर्चास्थळी उपस्थित काही महिलांनाही पोलिसांनी विनाकारण व्हॅनमध्ये कोंबल्याचे आरोप झाले. या महिला मोर्चात सहभागी होण्यासाठी आलो नाही असे सांगत असतानाही पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे म्हटले जात आहे.

राजकीय दबाव आणि कारवाई

या सर्व प्रकारावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. फडणवीस यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्त करत पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागवला होता. यानंतरच बुधवारी मधुकर पांडेंची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. या बदलीमुळे मिरा-भाईंदरच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात नव्याने चर्चांना उधाण आले आहे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!