
शनिवारी पार पडलेल्या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे १९ वर्षानंतर एकत्र आले आहेत. त्यानंतर आता ठाकरे ब्रॅण्डच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. तर आमदार संजय गायकवाड यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊन ठाकरे हा आता ब्रँड राहिला नसल्याचं म्हटलं आहे. मुंबईत पार पडलेल्या या मेळाव्यानंतर अनेक नवीन समीकरण ही राजकारणात येऊ घातल्याचं दिसून आलं आहे.
ठाकरे बंधू एकत्र आल्यास मतांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मत व्यक्त केलं आहे. "जर हे दोघं 15 वर्षांपूर्वी एकत्र आले असते, तर कदाचित काहीतरी राजकीय चित्र बदललं असतं. पण आता या भेटीचा फारसा परिणाम होणार नाही," असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
"उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ विचार सोडून दिला. आणि राज ठाकरे यांनीसुद्धा टाळीला टाळी द्यायला फार उशीर केला आहे. त्यामुळे आता या एकत्र येण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही ठोस परिणाम होईल, असं वाटत नाही," असं गायकवाड़ यांनी म्हटलंय. ठाकरे हा ब्रँड राहिला नसून "आता ठाकरे नावातला ब्रँड राहिलेला नाही. सध्या राजकारणात तुमचं जनतेशी किती प्रत्यक्ष जोडलेपण आहे, किती काम करता, हे महत्त्वाचं आहे. जर ठाकरे नावच एक ब्रँड असतं, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात 288 आमदार निवडून यायला हवे होते. पण तेव्हाही 70-74 च्याच आसपास होतो असं पुढं बोलताना गायकवाड यांनी म्हटलंय.