मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर कठोर भूमिका घेतल्यानंतर, आता मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या आंदोलकांना महत्त्वाचा आणि अंतिम इशारा दिला आहे. "मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. कुणाच्या सांगण्यावरून रस्त्यावर हुल्लडबाजी करू नका," असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. जे आंदोलक नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांनी लगेच आपल्या गावाकडे परत जावे, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. जरांगे यांनी म्हटले की, “मी शेवटचे सांगतो आहे, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. जर तसे घडले तर त्याला सोडणार नाही.”