
CM Devendra Fadnavis on Sharad Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत. 'इंडियन एक्सप्रेस ग्रुप'च्या 'एक्सप्रेस अड्डा' या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, शरद पवार यांच्या अनेक गोष्टी त्यांना आवडतात. त्यांनी म्हटले, "शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. काही गोष्टी अशा आहेत ज्या मी सहमत नाही. मात्र त्यांच्या सातत्याचे मला खूप कौतुक वाटते. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी ते काम करत राहतात." राजकीय मतभेद असूनही त्यांनी पवारांच्या कार्यशक्तीला सलाम केला.
लव्ह जिहाद आणि व्होट जिहादबाबत फडणवीसांचे स्पष्ट मत
याच कार्यक्रमात सहभागी असताना देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहाद आणि व्होट जिहाद या वादग्रस्त मुद्द्यांवरही आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, “तरुण मोठ्या संख्येने आयसिससारख्या कट्टर संघटनांमध्ये का सामील होत आहेत, हे समजून घेणं आवश्यक आहे. अल्पसंख्याक समाजातील कट्टरतावाद हे एक वास्तव आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”
फडणवीस पुढे म्हणाले की, "लव्ह जिहाद या संकल्पनेवर अनेकदा चर्चा केली जाते. काहींना हे अतिशयोक्ती वाटते, पण अनेक जिल्ह्यांमध्ये प्रेमाच्या नावाखाली शोषणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी लव्ह जिहाद ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट आहे." त्यांनी हेही स्पष्ट केलं की, "प्रत्येक घटना चिंतेचा विषय नसली तरी, विशिष्ट ठिकाणी घडलेल्या काही घटना सामाजिकदृष्ट्या गंभीर प्रश्न निर्माण करतात."
फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांनी पवार यांच्या कार्यशक्तीचे कौतुक करतानाच, लव्ह जिहादसारख्या संवेदनशील विषयावरही आपले परखड मत नोंदवले आहे.