
नागपूर: हिऱ्याच्या अंगठ्या घालून लग्न करण्याचे स्वप्न... आणि त्या स्वप्नासाठी निवडलेला गुन्हेगारीचा मार्ग. नागपूरमध्ये घरकाम करणाऱ्या एका तरुणीने मालकिणीच्या दोन मौल्यवान हिऱ्यांच्या अंगठ्या चोरल्या आणि पसार झाली. मात्र, पोलिसांनी अचूक तांत्रिक तपास करत तिला थेट पश्चिम बंगालमधून अटक केली. या प्रकरणात तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मारिया सूर्यराव सुक्का (३०), मूळची पश्चिम बंगालची रहिवासी, सध्या नागपूरच्या विनायक नगर परिसरात वास्तव्यास होती. ती गेल्या वर्षभरापासून कडबी चौकात राहणाऱ्या नुपूर अनिरुद्ध अग्रवाल यांच्या घरी घरकाम करत होती. तिचा प्रियकर पवन भास्कर बडगुजर (३०) नाशिकचा रहिवासी आहे. १७ मे रोजी नुपूरचे कुटुंब गावाला गेले होते आणि ती घरी एकटीच होती. मुलाची देखभाल करण्यासाठी तिने मारियाला बोलावले होते. त्याच दिवशी मारियाने नुपूरच्या हिऱ्यांच्या अंगठ्यांचे कौतुक करत, लग्नात तशाच अंगठ्या घालण्याची इच्छा व्यक्त केली होती.
१८ मे रोजी घरातून दोन हिऱ्यांच्या अंगठ्या गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर नुपूरने लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात मारिया अंगठ्या चोरताना स्पष्ट दिसून आली. पण तोपर्यंत ती पसार झाली होती. नुपूरने तत्काळ जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे मारियाचा मागोवा घेतला. ती पश्चिम बंगालमधील मूळ गावी लपून बसल्याचे समजताच महिला पोलिसांसह एक पथक तिथे रवाना झाले. तिला ताब्यात घेऊन नागपूरला ट्रान्झिट रिमांडवर आणण्यात आले.
चौकशीत मारियाने चोरीची कबुली दिली आणि अंगठ्या प्रियकर पवनकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नाशिकमध्ये जाऊन पवनलाही अटक केली आणि त्याच्याकडून दोन्ही अंगठ्या जप्त केल्या.
जरीपटका पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत असून, ही चोरी पूर्वनियोजित होती की फक्त मोहाच्या भरात घडलेली घटना, याचा तपास सुरू आहे.