मुंबई : महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. याशिवाय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वारे वेगाने वाहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय.
अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. सलग आठव्या दिवशी कमी दाबाचा पट्टा असल्याने समुद्रात पुन्हा वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
27
महाराष्ट्रभर पावसाचा इशारा
महाराष्ट्रातून एक टर्फ लाइन आडवी गेल्याने पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, पालघर, ठाण्यासह मराठवाडा-विदर्भातही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
37
नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
हवामान खात्याने नागरिकांना समुद्रकिनारी व नदीकिनारी जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. गुरुवारी मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं गेल. पण आज पावसाने थोडी उसंत घेतली आहे.
57
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा तर विदर्भात विश्रांती
सातारा, पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि बुलढाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील.
विदर्भात गेल्या आठवडाभर मुसळधार पावसानंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात येणार असून, सकाळी 6 ते 7 दरम्यान गोदावरी नदीपात्रात 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
67
कोल्हापुरातील पूरस्थिती
कोल्हापुरातील पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आंबेवाडी आणि चिखली गावाला स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पूरस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
77
नाशिकमध्ये रेड अलर्ट
हवामान खात्याने नाशिकसाठी रेड अलर्ट आणि पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गंगापूर धरणातून 6,340 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रामकुंड व गोदा घाट परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे. याशिवाय उजनी धरणातून तब्बल 1 लाख 10 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे भीमा नदीत महापूर आला असून अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. इंदापूर तालुक्यात भावड्या-गारआकोलेला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.